नागपूर : समीर जोशीच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये एजंटांची भूमिका महत्त्वाची होती. कंपनीचा प्रचार आणि जास्त व्याजाचे लालच देऊन गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. गुंतवणूकदारांची रक्कम परत करायचीच नसल्याने जोशीने एजंटांना गुंतवणुकीच्या रकमेनुसार मोठे कमिशन दिले. तज्ज्ञांनुसार, जिथे एजंट तिथे घोटाळा नक्की समजायचा. ही बाब समीर जोशीवर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर पुढे आली आहे.
पेंशन नसलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेरायचे एजंटसमीर जोशीने सर्वाधिक फसवणूक पेंशन नसलेल्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केली. महावितरण, महाजेनको आणि महानिर्मितीमध्ये निवृत्त होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्रित लाखो रुपये मिळतात. निवृत्त होणाऱ्यांची यादी एजंट आधीच गोळा करायचे. संबंधिताची वारंवार भेट घेऊन जास्त व्याजाचे लालच देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याकरिता त्यांनी श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट्स, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खासगी बँका आणि विविध पतसंस्थांच्या व्याजदराचा तुलनात्मक चार्ट तयार केला होता. तो गुंतवणूकदारांसमोर ठेवायचा. अखेर २५ ते ३० टक्के पेंशन नसलेले अधिकारी व कर्मचारी एजंटांच्या जाळ्यात फसायचे. कंपनीत गुंतवलेली रक्कम गुंतवणूकदारांना कधीच परत मिळाली नाही.
समीर जोशीचा एजंटांवर विश्वास समीर जोशीने कंपनीला मोठे करण्यासाठी एजंटांवर विश्वास टाकला. त्यांच्यासाठी मोठ्या हॉटेल्समध्ये विविध उपक्रम राबविले. प्रत्येकाला लक्ष्य दिले आणि गुंतवणुकीच्या रकमेनुसार कमिशन ठरवून दिले. जोशीने एजंटांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत समीर जोशी हजर असायचा. शिवाय दर बैठकीत नवीन एजंटची नियुक्ती करायचा. या माध्यमातून समीर जोशीच्या कंपनीत मोठी गंगाजळी जमा झाली आणि एजंटांनीही लाखो रुपये कमावले. आता सहआरोपी एजंटांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
जोशीने ५ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करून २५० कोटींचा घोटाळा केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात काढण्यात आला होता. मात्र, ५ हजार गुंतवणूकदारांपैकी काही जणांनीच त्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखविली. त्याच्याविरुद्ध नागपूर पोलिसांनी विविध एफआयआर नोंदविल्या. त्या आधारावर ईडीने तपास सुरू केला. श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट्स अंतर्गत जोशीने अनेक निष्पाप गुंतवणूकरादांना फसविले.
जोशीने योजनेच्या फायद्यांबाबत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीही केल्या. त्यावरू भाळून प्रत्येकाने लाखो रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांच्या पैशांचा दुरुपयोग करून स्वत:च्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावाने मालमत्ता गोळा केली. नोंदीनुसार जोशीने एकूण १,२६७ गुंतवणूकदारांची अंदाजे १०५.०५ कोटींनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात एकूण २५ एजंट्सला पोलिसांनी सहआरोपी केले आहे.
एजंट असलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करू नकाएजंट असलेल्या कंपन्या वा संस्थांमध्ये गुंतवणूक करू नये. जर एजंट एखाद्या योजनेची माहिती वारंवार पटवून देत असेल, तर गुंतवणूकदारांनी अशा एजंटपासून दूर राहावे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कंपनीची चौकशी करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन अर्थतज्ज्ञांनी आहे.