मंगेश तलमले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : नवख्या प्रवाशांची फसगत हाेऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राेडलगत ठिकठिकाणी गावाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांची दिशा दर्शविणारे फलक लावले जातात. काही फलकांवर त्या गावांचे अंतरही नमूद केले जाते. खात (ता. माैदा) परिसरातील वाय पाॅइंटवर लावलेला दिशादर्शक फलक हा चुकीचा असून, ‘गाव कुठे अन् दिशादर्शक फलक कुठे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नवख्या वाहनचालकांबरोबरच प्रवाशांचीही दिशाभूल हाेत आहे.
या वाय पाॅइंटजवळ लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर महालगाव, माेरगाव व पिंपळगाव या तीन गावांची नावे, त्यांच्या दिशा व अंतर नमूद केले आहे. मात्र, या राेडवर व परिसरात माेरगाव नावाचे गावच नाही. पिंपळगावकडे जाणाऱ्या मार्गावर पिंपळगाव, नंतर मुरमाडी गाव आहे. येथील दुसरा राेड हा महालगावला जाताे. हा मार्ग महालगावनंतर भंडाऱ्याला जाताे. याही राेडवर कुठेच माेरगाव नाही.
या फलकावर महालगावचे अंतर १.३ कि.मी. नमूद केले असून, वास्तवात ते या फलकापासून ४.५ कि.मी. आहे. येथून जवळच असलेल्या मैलाच्या दगडावर महालगावचे अंतर ४ कि.मी. नमूद केले आहे. माेरगाव हे मुळात रामटेक-भंडारा मार्गावर असून, ते अंतर या ठिकाणापासून ५ कि.मी. आहे. वास्तवात या फलकावर माेरगावचे अंतर २.७ कि.मी. नमूद केले आहे. ते गाव या फलकापासून फिरून गेल्यावर ८ कि.मी. आहे.
....
वाहनचालकांची फसगत
या चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नवख्या वाहनचालकास महालगाव येथे जावयाचे असल्यास ताे आधी पिंपळगावला जाताे आणि तिथून परत येऊन महालगावला जाताे. माेरगावला जाणारी व्यक्ती आधी महालगावला जाते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची ही चूक नवख्या वाहनचालक व प्रवाशांसाठी मनस्ताप देणारी ठरत आहे. त्यामुळे ही चूक तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे.