लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप सरकारने मोठा गाजावाजा करीत दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची घोषणा केली होती. तब्बल ३५० कोटी रुपये यावर खर्च होणार होते. त्यापैकी ४० कोटीची घोषणाही केली होती, परंतु यादृष्टीने काहीही झालेले नाही. उलट निधीअभावी स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणाचे कामही रखडले आहे.
भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा केली होती. एक-दोन वेळा नाही तर अनेकदा त्यांनी ही घोषणा केली. दीक्षााभूमीवरूनच त्यांनी साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाच्या विकासाचे आश्वासन दिले होते. यापैकी ४० कोटी रुपये देण्याची घोषणाही केली होती. पुढे त्याचे काय झाले कुणालाच माहीत नाही. स्मारक समितीलाही या योजनेचे पुढे काय झाले याची माहिती नाही. यातच केंद्राच्या दिल्ली येथील आंबेडकर फाऊंडेशनतर्फे स्मारकाच्या डोमच्या नुतनीकरणासाठी १० काेटी रुपये मंजूर झाले होते. यापैकी ४ कोटी रुपयाचा निधीही मिळाला. डोमच्या कामालाही सुरुवात झाली. परंतु उर्वरित निधीअभावी हे काम रखडले आहे.
उर्वरित निधी मिळावा
स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ ४ कोटी रुपये मिळाले. उर्वरित निधी तातडीने मिळावा. यासोबतच दीक्षाभूमीला लाागून असलेली कृषी विभागाची जागा सरकारने द्यावी, अशी स्मारक समितीची मागणी आहे.
विलास गजघाटे
सदस्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी