नागपूर : गुन्हा एका प्रांतात आणि तक्रार दुसऱ्या प्रांतात, असा प्रकार वारंवार घडत असल्याने रेल्वे पोलिसांना (जीआरपी) गुन्ह्यांचा उलगडा करण्यास बऱ्याच अडचणी निर्माण होतात. मात्र, आता तसे घडणार नाही. गुन्हा कुठेही घडो आणि तक्रार कुठेही दाखल होवो, त्याचा तातडीने छडा लावण्यासाठी जीआरपी प्रयत्न करेल. होय, त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांची को-ऑर्डिनेशन कमिटी तयार झाली असून, ही कमिटी रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
रेल्वेतील बहुतांश गुन्ह्यांचा लवकर छडा लागत नसल्याची ओरड होते. त्यात तथ्य असले तरी गुन्ह्याचा लवकर छडा न लागण्यामागे कारणही सबळ आहे. धावत्या रेल्वेत कुणाची रोकड, माैल्यवान चीजवस्तू , दागिने चोरीला गेले आणि ती गोष्ट लक्षात यायला संबंधित प्रवाशाला जरा का विलंब झाला तर तोपर्यंत रेल्वेगाडी कुठल्या कुठे, अर्थात एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर निघून जाते. जर तो प्रवासी झोपेत असेल आणि त्यावेळी गुन्हा घडला असेल तर गाडी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात निघून जाते. अशा वेळी संबंधित प्रवासी त्या रेल्वे स्थानकावर तक्रार नोंदवतो. म्हणजेच गुन्हा एका ठिकाणी घडतो आणि तक्रार दुसऱ्याच ठिकाणी नोंदवली जाते. उदाहरणार्थ गुन्हा नागपूरजवळ घडला असेल आणि तो लक्षात येईपर्यंत ती ट्रेन हैदराबाद, भोपाळ किंवा रायपूर किंवा अशाच दुसऱ्या ठिकाणी पोहोचली असेल तर तेथे तक्रार नोंदवून घेणारे पोलिस 'झिरो क्राईमी' करून तपासासाठी प्रकरण कागदपत्रांसह टपालाने नागपूर पोलिसांना पाठवणार.
हे टपाल मिळण्यास १० ते १५ दिवस लागेल. त्यानंतर असा काही गुन्हा घडल्याचे नागपूरच्या रेल्वे पोलिसांना माहिती होईल आणि ते तपासाला सुरुवात करणार. हा प्रकार केवळ नागपूरच नव्हे तर विविध प्रांतातील बहुतांश पोलिस ठाण्याच्या बाबतीत घडतो. दरम्यान, या १० ते १५ दिवसांत संबंधित गुन्हेगार कुठल्या कुठे पळून जाणार, पुरावेही नष्ट होणार. त्याचमुळे रेल्वेतील गुन्ह्यांचा तातडीने छडा लागत नाही. मात्र, आता असे होणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांची 'को ऑर्डिनेशन कमिटी' तयार झाली आहे. त्यामुळे आता कुठेही गुन्हा घडो अथवा कुठेही दाखल होवो, त्याची संबंधित पोलिस ठाण्यात व्हॉटसअॅप किंवा मेलवरून तातडीने संबंधित पोलिसांना सचित्र माहिती मिळेल. त्यामुळे लगेच तपास सुरू होईल आणि गुन्ह्यांचा तातडीने छडा लावणेही शक्य होईल.