नरेश डोंगरे नागपूर : देशात कुठेही स्फोट झाला किंवा स्फोटके सापडली, तर बऱ्याचदा त्या घडामोडीशी नागपूरचे नाव जोडले जाते. यापूर्वी हैदराबाद, कर्नाटकसह अनेक ठिकाणी झालेल्या स्फोटांत नागपुरात तयार झालेल्या स्फोटकांचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर गडचिरोली, छत्तीसगडपासून ते थेट काश्मीरपर्यंत ठिकठिकाणी जप्त करण्यात आलेली स्फोटकेही नागपुरातीलच असल्याचे उघड झाले होते. गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकेही नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतून बाहेर पडल्याचे उजेडात आल्याने तपास यंत्रणांच्या नजरा पुन्हा एकदा नागपूरकडे वळल्या आहेत.
कोळसा खदानी, विहिरी, नियोजित मार्गांच्या मध्ये येणारे उंचवटे कापण्यासाठी (हिल कटिंग) जिलेटिन, ईमल्शनचा वापर होतो. अंबानी यांच्या बंगल्याजवळ आढळलेल्या कांड्या जिलेटिन नव्हे, तर ईमल्शन्स आहेत. जिलेटिनच्या तुलनेत त्याची स्फोटक क्षमता कमीच असते. जिलेटिन साधारणत: सात वर्षांपर्यंत उपयोगात आणले जाते. ईमल्शनची पॉवर केवळ सहा महिन्यांपर्यंतच असते. नंतर ते आपोआप निष्काम होतात.
मुंबई पोलिसांनी केली कंपनीकडे चौकशी
मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री सोलर एक्सप्लोसिव्ह प्रशासनाशी संपर्क साधून प्रदीर्घ चौकशी केली. कंपनीनेही स्फोटकाचे उत्पादन तसेच विक्रीच्या प्रक्रियेसंदर्भात खुलासा केला. ‘लोकमत’ने कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, काय विचारणा झाली ते सांगण्यास नकार दिला. मात्र, उत्पादन आणि वितरणासंबंधीची संपूर्ण प्रकिया शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली केली जात असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना संपर्क केला असता मुंबई पोलिसांकडून अद्याप यासंबंधाने संपर्क झाला नसल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात सात एक्सप्लोसिव्ह कंपन्या
स्फोटके निर्मितीच्या एकट्या नागपूर जिल्ह्यात सोलार एक्सप्लोसिव्ह (चाकडोह, कोंढाळी), इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह (सावंगा, कोंढाळी), केलटेक एक्सप्लोसिव्ह (गरमसूर, कोंढाळी), ओरिएन्ट एक्सप्लोसिव्ह (शिवा खापरी, कोंढाळी), एसबीएल एक्सप्लोसिव्ह (कोतवाल बर्डी, कळमेश्वर), कमर्शिअल एक्सप्लोसिव्ह (गोंडखैरी, कळमेश्वर) आणि अम्मा एक्सप्लोसिव्ह (ढगा, कळमेश्वर) या सात एक्सप्लोसिव्ह कंपन्या आहेत. कांड्या, पावडर आणि द्रव स्वरूपातील स्फोटके त्या तयार करतात.
अशी होते विक्री आणि नोंद
स्फोटकांच्या बॉक्सवर बॅच नंबर व बारकोड असतो. त्यावरून ‘पेसो’च्या पोर्टलवर त्याचा ट्रॅक मिळतो. जिलेटिन, ईमलशन्सच्या २०० कांड्या एका बॉक्समध्ये असतात. बहुतांश कंपन्या १००-२०० बॉक्सची मागणी करतात. nही स्फोटके कुणाला विकली, कुठून कुठे पोहोचली ही सगळी माहिती पोर्टलवर नोंदली जाते. मात्र, नंतर वितरकाकडून ती खुली करण्यात आल्यास त्याचा शोध लावणे कठीण जाते. हीच बाब हेरून दहशतवादी, नक्षलवादी घातपाती कृत्ये घडवून आणतात.