मंगेश व्यवहारे - राजेश टिकले
नागपूर : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून राज्यभरातील वातावरण तापलेले असतानाच नागपुरातील न्यू बाबूळखेड्यात गेल्या तीन पिढ्यांपासून सामाजिक एकोपा व जातीय सलोखा जपला जातोय. येथे हनुमान मंदिर व निजामी मशीद केवळ १०० फुटावर आहे. गेल्या ३५ ते ४० वर्षांत अजानचा त्रास हिंदूंना कधी झाला नाही. मशिदीच्या आवाजाला दाबण्यासाठी भोंग्याचा आवाज मोठा करून हनुमान चालिसा म्हणण्याची गरज पडली नाही. या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मते प्रार्थना ईश्वराची असो की अल्लाची, ती शुभ, मंगल आणि पवित्रच आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असताना ईदच्या पर्वावर न्यू बाबूळखेडा येथील निजामी मशिदीला भेट दिली. या परिसराला खरे तर मिनी इंडिया म्हणायला काहीच हरकत नाही. मशिदीच्या १०० फुटांवर हनुमान मंदिर, मशिदीच्या अगदी समोर गिरजाघर, थोड्या अंतरावर मैत्री बौद्ध विहार, १०० फुटांच्या अंतरावरच गजानन महाराजांचे मंदिर आणि दक्षिण नागपुरातून निघणारा भव्य साई पालखी सोहळा असे बहुआयामी धार्मिक वातावरण येथे आहे. ईदला ज्या रस्त्यावर हिरव्या पताका लागतात, त्याच रस्त्यावर हनुमान जयंतीच्या भगव्या व आंबेडकर जयंतीच्या निळ्या पताकाही लागतात. पताकांचे रंग वेगवेगळे असले तरी येथील रहिवासी एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामुळेच गेल्या तीन पिढ्यांपासून येथे कुठलीही जातीय दंगल झाली नाही.
ईदनिमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यानिमित्त त्यांच्यातील एकोपा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अब्दुल शकील, सैय्यद सादिक अली, अब्दुल रशीद म्हणाले की, पहाटेच्या अजानचा त्रास होतोय, अशी आजपर्यंत कुणाची तक्रार नाही. तर गणेश मिश्रा, चेतन मिश्रा म्हणाले, मशिदीची अजान ही आमच्या दिनचर्येचा भाग झाली आहे. २ मिनिटांच्या अजानचा काय त्रास. वस्तीच्या एकोप्याचे उदाहरण देताना ते म्हणाले ईदनिमित्त पोलीस बंदोबस्त लावला होता. आम्हीच म्हटले आमच्या वस्तीत बंदोबस्ताची गरज नाही. सकाळी उठून आम्हाला एकमेकांसोबतच राहायचे आहे. मशिदीवरील भोंगे काढा म्हणणारा आमचे पोट भरणार नाही.
भागवतात मुस्लिम बांधवांकडे असते नियोजन
गणेश मिश्रा म्हणाले, आमच्याकडे होणाऱ्या भागवत कथा सप्ताहात मुस्लिम बांधवांकडे सर्व नियोजन असते. साऊंड, पेंडॉल, सजावटीचे काम मुस्लिम बांधव सांभाळतात. साई पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करतात. एकोपा, सर्वधर्म समभाव हे आमच्या वस्तीचे वैशिष्ट्य आहे. धार्मिक सर्वच आहेत, कुणाचेही धर्माबद्दल कट्टर विचार नाहीत.
येथेच जन्मलो, येथेच मरणार
- १९८७ मध्ये ही मशीद बनली. मशिदीच्या सभोवताली हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन लोक राहतात. एकाचीही अजानबद्दल तक्रार आली नाही. उलट वस्तीच्या दिनचर्येची सुरुवात अजानपासून होते, असेही येथील नागरिक म्हणतात. आज ईदलाही आमच्या मौलानांनी समाजात एकोपा, शांतीची प्रार्थना केली. आम्ही येथेच जन्मलो आणि येथेच मरणार आहोत. मग आपल्याच लोकांशी का वादावादी करावी.
दीन मोहंमद, ट्रस्टी, मशीद निजामी