योगेश पांडे नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख यांनी टीकास्त्र सोडले आहे. सावरकरांबाबत अनेक जण वाट्टेल ते बोलतात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक जण शहीद झाले किंवा कारावास भोगला. मात्र या टीकाकारांच्या कोणत्या पुर्वजांना फाशी झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विश्व संवाद केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या देवर्षि नारद जयंती पत्रकारिता पुरस्कारांचे मंगळवारी वितरण झाले. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील वृत्तनिवेदक रुबिका लियाकत, विश्व संवाद केंद्राचे प्रमुख अतुल पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. सेल्युलर जेलमध्ये यातना सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की, माणूस कठीण प्रसंगाला किती संयमाने सामोरे जाऊ शकतो हे माणसाच्या आठवणी व संस्कारांवर अवलंबून असते. सावरकरांचे हे विचार पत्रकारिता जगतात काम करणाऱ्यांसाठी अतिशय योग्य आहेत. जर माध्यमे चांगली होणे अपेक्षित असेल तर नागरिकांनीदेखील सोशल मीडियावर जबाबदारीने वागले पाहिजे, असे आंबेकर म्हणाले. पत्रकारांनी नेहमीच सत्याच्या बाजूने असायला हवे. समाजात ५ ते १० टक्के लोक आहेत जे बदलत नाहीत आणि राष्ट्रहितासाठी चालत राहतात, तर तेवढेच लोक आहेत ज्यांना समाजाच्या हिताची आणि राष्ट्रहिताची पर्वा नाही. उर्वरित ८० टक्के लोक हे देशात कसे वातावरण आहे ते पाहून आपली भूमिका ठरवितात. त्यामुळे समाजात सकारात्मकता आणण्यासाठी नकारात्मक मनोवृत्ती असलेल्या ५ ते १० टक्के लोकांनाच बदलविणे आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.
धर्म, भाषा, पंथ, लिंग यापेक्षा देशाचे हित सर्वात महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी नेहमीच देशहिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन लियाकत यांनी केले. देशहिताच्या मुद्द्यांवर पत्रकारांनी निष्पक्ष राहणे चुकीचे ठरते. पत्रकारांनी आपले मुद्दे निर्भयपणे मांडले पाहिजेत, असे प्रतिपादन रुबिका लियाकत यांनी केले. प्रसाद बरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दिपाली टेकाम यांनी संचालन केले, तर महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस यांनी आभार मानले. यावेळी तरुण भारतचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी संजय रामगिरीवार, एबीपी माझाचे विदर्भ ब्युरो चीफ रजत वशिष्ठ, लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार विशाल महाकाळकर, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर निखील चंदवानी व सिटीझन जर्नलिस्ट डॉ.लखेश्वर चंद्रवंशी यांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
राज्यघटनेतील स्पिरीट हरविले होतेयावेळी आंबेकर यांनी इतिहासाच्या मुद्द्यांवरदेखील भाष्य केले. राज्यघटनेतील स्पिरीट अनेक वर्ष हरविले होते. राज्यघटनेच्या ‘स्पिरीट’मध्ये गुरुकूलातील ज्ञान सांगितले आहे, भारतीय मूल्यांची भावना आहे. आता यावर काम होत आहे. काही लोक याला विरोध करत आहे, तर काही जण त्यांच्या राज्यातील गोष्टी लपविण्यावर भर देता आहेत. मात्र सत्य समोर येतेच, असे आंबेकर म्हणाले.