लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दूरदर्शनवर २५-३० वर्षापूर्वी प्रसारित झालेल्या रामायण, महाभारत, चाणक्य या पौराणिक-ऐतिहासिक मालिकांचे पुन:प्रसारण होताच, टीआरपीचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत. नव्या पिढीतील तरुणही या मालिकांच्या प्रेमात पडले असून, दररोज सकाळी व रात्री एपिसोड लागताच रस्ते सुनसान होऊन जातात. ही गोष्ट वेगळी की तेव्हा मालिकांमुळे अघोषित कर्फ्यु लागायचा आणि आता लॉकडाऊनमुळे या मालिका प्रसारित होत आहे. एका अर्थाने २५-३० वर्षापूर्वीचेच चित्र आजही दिसत आहेत. या मालिकांचा तरुण पिढीवर एवढा प्रभाव आहे की ही पात्रे आता सोशल माध्यमांवर धुमाकुळ घालायला लागली आहेत.सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे अॅप कार्यरत आहेत. या अॅपद्वारे आपले पाप-पुण्य मोजले जाते, आपल्या आवडीच्या राजकारण्यांशी आपली कुंडली जुळवली जाते, हिरो-हिरोईन्स आपल्या चेहऱ्याशी कसे मिळते-जुळते आहेत, हे सांगितले जाते. हा भाग वेगळा की सगळे मनोरंजनात्मक असते. तरी देखील या अॅप्सला नेटीझन्सची प्रचंड पसंती प्राप्त होत असते. रामायण, महाभारत या मालिकांमुळे तरुण पिढी स्वत:ला त्या पात्रांसोबत जुळवून बघत आहे, हे चांगले चित्र आहे. राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे. अशा पोस्ट व्हायरल करण्यासोबतच गंमती-जमती आणि इतिहासाचा कानोसाही घेतला जात आहे. या मालिकांमुळे इंटरनेटवर रामायण, महाभारतातील कथा वाचण्याचा छंदही वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.
तुम्ही महाभारत किंवा रामायणातले कोणते पात्र आहात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 8:08 PM
राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे.
ठळक मुद्देसोशल माध्यमांवर रंगतेय रामायण, महाभारत!राम, कृष्ण, रावण, कुंभकर्णांनी घातलाय धुमाकुळ