संजय रानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवनी या वाघिणीच्या बछड्यांना कोणत्या जंगलात सोडायचे, यावर सध्या वन विभाग विचार करीतआहे. कोणते जंगल त्यांच्यासाठी सुरक्षित राहील, याचा विचार करताना पुढे आलेल्या पर्यायांवर विचार सुरू आहे. त्यांना पेंचच्या जंगलात सोडायचे की नवेगाव-नागझिरा अथवा गडचिरोलीच्या जंगलात सोडायचे यावर गंभीरपणे विचार सुरू आहे. अलिकडेच या पिलांना जंगलात सोडण्यासाठी नॅशनल टायगर रिफर्व्ह ऍथॉरिटीने परवानगी दिली आहे.
यातील मादी पिलू आपल्या आईसोबत बराच कमी काळ राहिले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये निसर्गत: शिकार करण्याची आणि लढण्याची क्षमता कमी आहे. त्या पिलासाठी योग्य ठिकाण निवडणे हे आव्हानात्मक काम ठरले आहे. यापूर्वी टीएफ-१ व टीएफ-२ ला पेंचमध्ये पाठविण्यात आले होते. काही काळाने यातील एकाला प्राणिसंग्रहायलात व दुसऱ्याला जंगलात सोडण्यात आले. मात्र नैसर्गिक क्षमता कमी असल्याने २० दिवसातच जंगलात सोडलेल्याला परत आणावे लागले होते. यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहे. २०१८ च्या गणनेच्या तुलनेत येथे पूर्ण वाढ झालेले ४० वाघ होते. त्यामुळे येथे संघर्षाच्या अनेक घटना घडल्या. अभ्यासकांच्या मते, कोणत्याही वाघाला पेंचच्या जंगलात सोडणे यामुळेच योग्य नाही. तर नवेगाव-नागझिरामध्ये वाघांच्या देखभालीबद्दल नेहमीच मुद्दा उपस्थित झाला आहे.
या जंगलात जंगली कुत्र्यांची संख्या अधिक आहे, हे सुद्धा महत्वाचे आहे. तर, गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांमुळे वन विभागाचे नेटवर्क म्हणावे तसे सक्षम नाही. नक्षलवाद्यांमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग करणेही धोक्याचे असते. मध्य प्रदेश वन विभागाचे पेट्रोलिंग हत्तीवरून होते. तिथे हत्तींची या कामी चांगली मदत मिळते. हे लक्षात घेता महाराष्ट्रातील जंगलातही हत्तींची मदत पेट्रोलिंगसाठी घेण्यास वाव आहे.