नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी राज्यातील ४२ मतदारसंघ निवडण्यात आले असून येत्या २ व ३ रोजी मुंबईतील टिळक भवनात या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. संबंधित मतदारसंघात काँग्रेसची स्वत:ची ताकद किती आहे, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखायचा की, मित्रपक्षांसाठी सोडायचा, याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतली जाणार असून या आधारावरच काँग्रेस जागावाटपाची रणनीती आखणार आहे.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री या बैठकांना उपस्थित राहतील. २ जून रोजी विदर्भातील दहाही मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी १:३० वाजता बुलढाणा मतदारसंघापासून विदर्भाची सुरुवात होईल. यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, वर्धा, नागपूर व रामटेक मतदारसंघांवर चर्चा होईल. या बैठकांना मतदारसंघातील माजी मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख नेते, जिल्ह्याचे प्रभारी, सहप्रभारी, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले उमेदवार, जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे अध्यक्ष व विभागांचे अध्यक्ष यांना उपस्थित राहण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात चंद्रपूरची एकमेव जागाच काँग्रेसला जिंकता आली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेत्यांचाही कस लागणार आहे.