लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कोणत्या अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्या होत्या त्यांची यादी आणि त्या संघटनांच्या प्रमुखांची यादी मला देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत एकूण १४० संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यांतील ४० संघटना या नक्षलवाद्यांची फ्रंटल संघटना म्हणून काम केलेल्या आहेत. २०१२ साली ज्या फ्रंटल संघटनांना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नक्षल संघटना घोषित केले होते, या त्याच संघटना आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केला होता.
पटोले यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून विविध संघटना समाजोपयोगी कामे करीत आहेत. लोकशाही भक्कम करण्यासाठी कार्यरत अशा विविध संघटनांनी व राज्यातील विचारवंत ज्येष्ठ नागरिकांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. या संघटनांना अर्बन नक्षलवादी संबोधणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. तथापि, आपण ज्यांना अर्बन नक्षलवादी संबोधले, त्या संघटना व प्रमुखांची यादी मला द्यावी, अशी विनंती पटोले यांनी केली आहे.