नागपूर : पेट्रोल पंपावर गेल्यावर वाहनात इंधन भरत असताना मोबाईल फोनचा वापर टाळा अशा सूचनेची पाटी/फलक नेहमीच दिसून येते. पण बरेचजण त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, असे करणे हे कीती घातक ठरू शकते या व्हिडीओतून लक्षात येते. यामध्ये एका दुचाकीस्वाराने दुचाकीत पेट्रोल भरताना त्याच्या मोबाईलचा वापर करायचा प्रयत्न केला पण त्यानंतर जे घडलं ते धडकी भरवणारं होतं.
सध्या पेट्रोल पंपावरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यात दुचाकीत पेट्रोल भरत असताना दुचाकीस्वाराचा फोन वाजतो त्याच्या खिशातून फोन काढून बोलणार तितक्यात अचानक मोबाईल पेट घेतो. दुचाकीच्या टाकीत पेट्रोल रिफील होत असल्याने संपर्कात येताच आग लागते. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच गोंधळतात. दुचाकीस्वार व त्यामागे बसलेला माणूस तत्काळ दुचाकीला सोडून बाजुला होतो व उपस्थित कर्मचारी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणतात. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग व तितकाच धडकी भरवणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तो ही घटना नागपूर जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावरील असल्याचे बोलले जात आहे.
एक लहानशी चूक किती मोठ संकट ओढावू शकते हे या व्हिडीतून दिसून येतं. सुदैवाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणलं अन् मोठी घटना टळली. अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. सध्या हा व्हिडीओ बराच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.