लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाहेरील पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी मेहनत करणाऱ्यांना संधी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा.विनय सहस्रबुद्धे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षामध्ये ‘इनकमिंग’ सुरू असले तरी मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा दावा त्यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना केला.नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप पक्ष हा काही प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाही. कुणी एखादी परीक्षा द्यावी व त्याला पक्षाचा मार्ग मोकळा असे येथे होत नाही. भाजप एक जिवंत पक्ष आहे व नवीन लोक येथे येणे स्वाभाविक आहे. इतर पक्षातील नेते व पदाधिकाºयांना भाजपचे आकर्षण वाटते हा तर आमचा गुण आहे. बाहेरचे कितीही लोक आले तरी त्यांना पचवू व भाजपच्या प्रवासात सहभागी करून घेऊ, असे सूचक प्रतिपादन सहस्रबुद्धे यांनी केले.निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल असे अनेक लोक मानत आहेत. मात्र आम्ही मात्र निवडणुका एकतर्फी होतील असा विचार करत नाही. प्रत्येक निवडणूक एक आव्हानच आहे. केंद्र सरकारने मागील १०० दिवसात केलेली कामगिरीदेखील तळागाळापर्यंत पोहोचविली जाईल. आम्ही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा समोर न करता केवळ ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’च्या आधारावर जनतेमध्ये जाणार आहोत, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच चिमटादेखील काढला. पत्रपरिषदेला आ. गिरीश व्यास, निवडणूक व्यवस्थापन समितीचे सदस्य जमाल सिद्दीकी, महापौर नंदा जिचकार, प्रवक्त्या अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.
समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊलकलम ३७० हटविणे, देशात समान नागरी कायदा लागू करणे या दोन गोष्टी भाजपच्या अजेंड्यावरच अनेक वर्षांपासून होत्या. देशहिताच्या दृष्टीने या आवश्यक बाबी आहेत. कलम ३७० तर हटविण्यात आले. आता समान नागरी कायदा लागू करणे हे लक्ष्य आहे. ‘ट्रिपल तलाक’ विधेयक हे त्या दिशेने टाकलेलेच पाऊल आहे, अशी भूमिका विनय सहस्रबुद्धे यांनी मांडली.
जगात देशासंदर्भातील गैरसमज दूर करणारभारतासंदर्भात जगातील अनेक भागांमध्ये विविध गैरसमज आहे. बाहेरच्या लोकांना देश जवळून समजून घेता यावा व त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात यासाठी ‘आयसीसीआर’कडून (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) पुढाकार घेण्यात येणार आहे. याअंतर्गत एक विशेष अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यात देशातील संस्कृती, नृत्यकला, गायन, हस्तकला, पाककला इत्यादींबाबत सखोल माहितीचा समावेश असेल, असे विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
आरक्षणामुळे कुणाचेही ‘मेरिट’ नाकारले जात नाही‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ यासारख्या मोहिमांमुळे भाजपला भविष्यात अडचण येईल का असा प्रश्न विचारले असता सहस्रबुद्धे यांनी आरक्षणामुळे कुणाचेही ‘मेरिट’ नाकारले जात नाही, असे स्पष्ट केले.आरक्षण प्रवर्गातील गुणवंतांनादेखील ‘मेरिट’वरच संधी मिळते. त्यामुळे कुणाच्याही गुणवत्तेवर अन्याय झालेला नाही, असेदेखील ते म्हणाले.