नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात होत आहे. वाढते रुग्ण लक्षात घेऊन मेडिकलमध्ये ६०० वरून १००० खाटा करण्याच्या कार्याला गती देण्यात आली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत ‘क्लिनिकल’ डॉक्टरांची संख्या कमी पडत असल्याने, ‘नॉन क्लिनिकल’ डॉक्टरांचीही ड्युटी लावली जात आहे. रुग्णांच्या संपर्कात येऊन अनेक डॉक्टर पॉझिटिव्ह येत आहेत. डॉक्टरांची कमतरता भासत असताना नागपूरच्या मेडिकलमधील नऊ डॉक्टरांना जळगाव येथील कोरोनाच्या रुग्णसेवेत पाठविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे डॉक्टरांमध्ये रोष आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील आठवड्यात २२,५७८ नव्या रुग्णांची भर पडली तर, १६५ रुग्णांचे जीव गेले. ही संख्या चिंता वाढविणारी आहे. सोमवारी या वर्षातील सर्वाधिक कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली. ४० रुग्णांचे मृत्यू झाले तर, ३,५९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये रविवारी कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५१० पैकी ४७० खाटेवर रुग्ण आहेत. कोरोनाचे प्रसूती व बालरोग रुग्ण विभागाचे वॉर्ड वगळता, इतर वॉर्ड फुल्ल झाले आहेत. अतिदक्षता विभागातील खाट मिळण्यासाठी प्रतीक्षेची वेळ आली आहे. मेडिकलमध्ये केवळ विदर्भातूनच नाही तर आजूबाजूच्या राज्यातूनही रुग्ण येत आहेत. खाट नसल्याचे कारण देऊन परत पाठविले जात आहे. यामुळे मेडिकल प्रशासनाने आणखी ४०० खाटा वाढवून एकूण हजार खाटा करण्याचे कार्य हाती घेतले आहे. पुढील काही दिवसातच या खाटा रुग्णसेवेत सुरू होणार आहेत. यामुळे डॉक्टरांची मोठी फौज उभी करावी लागणार आहे. यातच काही डॉक्टर पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांची जागा भरून काढण्यासाठी मेडिकल प्रशासन अडचणीत आले आहे. ‘नॉन क्लिनिकल’मधील डॉक्टरांवरही कोरोनाबाधितांची जबाबदारी टाकली जात आहे. असे असताना, वैद्यकीय शिक्षण विभागाने जळगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपचार व व्यवस्थापनेकरिता राज्यातील पाच मेडिकलमधून २० डॉक्टरांना जळगाव मेडिकलमध्ये पाठविण्याचे आदेश काढले आहे. यात सर्वाधिक नऊ डॉक्टर नागपूर मेडिकलमधील आहेत. नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाला असताना, येथे डॉक्टरांची गरज असताना जळगाव मेडिकलमध्ये डॉक्टर पाठविणे योग्य नसल्याचे अनेक वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- तिथे गरज आहे म्हणूनच पाठविले
जळगाव मेडिकलमधील ४० वर डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे तिथे गरज असल्यामुळेच वरिष्ठांच्या आदेशानुसार डॉक्टरांना पाठविण्यात आले आहे. नऊमधून एक डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने आठ डॉक्टर गेले आहेत. त्यांना कायमस्वरूपी पाठविण्यात आलेले नाही आहे. तेथील अधिष्ठात्यांनी परवानगी दिल्यास १५ दिवसातच ते परतही येतील.
- डॉ. सुधीर गुप्ता
अधिष्ठाता, मेडिकल