नागपूर : महापालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस व शिवसेनेसोबत मिळून लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. स्थानिक नेत्यांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. परंतु आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर अधिकाधिक जागांवर निवडणूक लढेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी येथे स्पष्ट केले.
पक्षाचे संमेलन व शहर कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. पक्षाला नागपूरसह पूर्ण विदर्भात चांगले यश मिळेल, असा दावाही वळसे - पाटील यांनी यावेळी केला. त्यांनी यावेळी भाजपवर निशाना साधला. ते म्हणाले, भाजप नागपुरात २४ बाय ७चे आश्वासन पूर्ण करू शकले नाही. उद्योग न आल्याने रोजगाराच्या संधी नाहीत. यात भर म्हणजे, शेजारी राज्यातील लोक शहरात स्थायिक झाल्यानेही बेरोजगारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेना मेळाव्यासंदर्भात त्यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या गटाने याची काळजी घ्यावी व काही अडचणी निर्माण करू नये. मुस्लीम आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यापूर्वी आरक्षण द्यायचे आहे की नाही, हे राज्य सरकारने आधी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. एनआयच्या धाडीसंदर्भात विचारले असता, केंद्र सरकारने मिळालेल्या माहितीच्या आधारावरच ही कारवाई केली असेल, असे सांगितले.
अजित पवार यांच्या गृहमंत्री होण्याच्या इच्छेसंदर्भात मौन
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती, याबाबत वळसे - पाटील यांना विचारले असता त्यांनी मौन धारण केले. त्यांनी केवळ इतकेच सांगितले की, वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये गृहमंत्री बनवले होते, याची त्यांना कल्पना नाही.