नागपूर : ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या छत्रछायेखाली वाढलेले शंभुराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. अफाट सैन्य असूनही बादशाह औरंगजेबाशी त्यांनी अनेक वर्षे निकराने झुंज दिली व मराठ्यांचे साम्राज्य हिसकावू पाहत असलेल्या बादशाहासमोर ते अभेद्य भिंत बनून उभे राहिले. राज्याभिषेकानंतर कवी कलश यांना सल्लागार मंडळात नियुक्ती केल्यामुळे आधीच त्यांच्याविरोधात कारस्थान रचणाऱ्या दरबारातील घरभेद्यांचा द्वेष आणखी वाढला व कपटी डाव आखून शंभुराजांना औरंगजेबाच्या तावडीत दिले. पुढे औरंगजेबाने हाल हाल करून त्यांची हत्या केली. या पराक्रमी शिवपुत्रांच्या आयुष्यातील अशा रोमांचक प्रसंगांची गाथा मांडणारे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य पाहताना क्षणोक्षणी प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहतो.
लेखक, दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांची निर्मिती आणि टीव्ही मालिकेत संभाजी साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले हे महानाट्य सध्या रेशीमबाग मैदानावर सुरू आहे. मराठा साम्राज्याचे द्वितीय छत्रपती शंभुराजे यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष डोळ्यात साठविण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे. हा इतिहास मांडताना भव्यतेत कुठलीही कमतरता नसलेले हे महानाट्य पाहण्याची संधी सुटू नये असाच नागपूरकरांचा प्रयत्न असल्याने तिसऱ्या दिवशीही महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. माजी आमदार मोहन मते यांची संस्था असलेल्या माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे हे महानाट्य आयोजित करण्यात आले असून येत्या २८ डिसेंबरपर्यंत ते चालणार आहे. सोमवारी महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, बंटी कुकडे, सतीश होले, विक्रम कोरके, नीलेश डांगरे, मोहन मते यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन, अश्वपूजन व गजपूजन करून महानाट्याला सुरुवात करण्यात आली.शिवरायांच्या स्वराज्यातील वेगवेगळे महत्त्वाचे किल्ले व औरंगजेबाचा राजदरबार दर्शविणारा १३० फुटांचा भव्य असा फिरता रंगमंच, इतिहासाचा मागोवा घेणारी आकर्षक वेशभूषा, पोवाड्याच्या शब्दातून एकामागून एक घडणाऱ्या प्रसंगासह वेगवान कथानकामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हत्ती, घोड्यांचा उत्तम सहभाग, गडकिल्ल्यावर घडणारे व युद्धाचे प्रसंग शिवराय व शंभूराजे यांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत करतात. नाटक पाहणारे दर्शक हा प्रत्येक प्रसंग डोळ्यात साठवीत आहेत.