राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे ट्विटरवर फार सक्रिय असतात व राज्याबाहेरील घडामोडी पोस्ट करण्यावर त्यांचा जास्त भर असतो. इंधन दरवाढीवरून त्यांनी परत एकदा केंद्राला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला व भारतीयांच्या पेट्रोल खर्चाची तुलना थेट चीन व अमेरिकेतील नागरिकांशी केली. भारतीय नागरिकांचा २५ टक्के पगार पेट्रोलवर खर्च होतो, असे एका वित्ततज्ज्ञांचा दाखला देत दावादेखील केला. नागरिकांचा खरोखरच इतका खर्च पेट्रोलवर होतो का हा संशोधनाचा विषय आहे. मात्र नेटीझन्सनी या पोस्टवरून ऊर्जामंत्र्यांना वीज बिलांवरूनदेखील प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पेट्रोलच्या दरवाढीबाबत बोललेच पाहिजे, मात्र राज्यातील वीज बिलांवरदेखील अशाच पद्धतीने कधी बोलणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. गोरगरीब व्यक्तीदेखील वीज देयकाच्या ओझ्याने दबल्या आहे व त्याला दिलासा कधी मिळणार यावर खरोखरच मंत्रिमहोदयांनी बोलायला हवे, असा सूर समोर येत आहे.
कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:11 AM