विभागावर कोट्यवधीचा खर्च : रस्त्यावरील खड्डे मात्र कायम नागपूर : शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. खड्डे तातडीने बुजविण्याचे कारण पुढे करून खासगी हॉटमिक्स प्लांटवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. दुसरीकडे महापालिकेचा हॉटमिक्स आहे. परंतु नादुरुस्त अवस्थेत असूनही त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने तो पांढरा हत्ती बनला आहे. महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट सुरू करण्याच्या गेल्या पाच वर्षांत अनेकदा घोषणा करण्यात आल्या. परंतु कार्यवाही मात्र शून्य आहे. पावसाळा आला की शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडतात. यावर्षीच्या पावसाळ्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी यावर रोष व्यक्त केल्याने रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली. समितीने दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु प्रत्यक्षात ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. हॉटमिक्स विभागाने गेल्या वर्षात अडीच कोटींचे डांबर खरेदी केले. असे असतानाही एमआयडीसी येथील हॉटमिक्स प्लांटसाठी लागणाऱ्या डांबराच्या वाहतुकीसाठी पुन्हा ५९.३० लाखांचा खर्च केला जाणार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षाला दीड क ोटींचा खर्च केला जातो. तसेच खड्डे बुजविणाऱ्या जेटपॅचर यंत्रावर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. परंतु शहरातील रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. शहरातील सिमेंट रस्ते वगळल्यास इतर रस्त्यांची अवस्था गंभीर आहे (प्रतिनिधी) बँच मिक्सवर १४.१४ क ोटींचा खर्च महापालिकेच्या हॉटमिक्स प्लांट विभागाच्यातर्फे नवीन बँच मिक्स प्लांट खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. यात १२४ टीपीएच क्षमतेच्या बँच मिक्स प्लांटच्या खरेदीवर ४.८० कोटी, त्याच्या देखभालीसाठी एक क ोटी, वाहनांची खरेदी व भाड्याच्या वाहनांसाठी ८.३४ कोटी खर्च केला जाणार आहे. त्यातच नवीन प्लांटसाठी १४.१४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. शहरातील ४० टक्के रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने प्लांटची क्षमता वाढविण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
हॉटमिक्स बनला पांढरा हत्ती
By admin | Published: December 29, 2016 2:55 AM