नागपूर : कापुस खरेदी केंद्र लवकर सुरु करु असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु अद्याप एकही खरेदी केंद्र सुरु न झाल्याने पांढऱ्या सोन्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी सुध्दा राज्य सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही असा आरोप करीत शरद पवार गटातर्फे शनिवारी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ पांढऱ्या सोन्याची होळी करण्यात आली.
जि.प. सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी देशमुख म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार असतांना सन २०१९-२० मध्ये शेवटचे बोंड खरेदी करेपर्यत खरेदी केंद्र सुरु ठेवले होते. साधारणता कापूस मार्च-एप्रिल पर्यतच शासनाच्या माध्यमातुन खरेदी करण्यात येते.परंतु त्याकाळात ऑगष्ट महिन्यापर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवून जवळपास ९६ लाख क्विंटल इतकी विक्रमी कापसाची खरेदी झाली होती. यामुळे खुल्या बाजारात सुध्दा कापसाला १४ हजार रुपयापर्यत भाव मिळाले होते. परंतु सध्याच्या परिस्थीती मध्ये कापसाला बाजारात केवळ ६ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे.
कॉटन असोशिसेयन ऑफ इंडीयाचा दबावाखाली मोठया प्रमाणात विदेशातुन कापुस हा आयात करण्यात आला. आयात निर्यात धोरण अत्यंत चुकीचे असल्यामुळे सुध्दा कापसाचे भाव कमी झाले आहे, असा आरोप करीत कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.