योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरयाणातील भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिमटा काढला आहे. हरयाणात भाजप हरतो आणि आम्ही टीका करतो याच तयारीत महाविकास आघाडीचे नेते बसले होते. मात्र त्यांना संधी मिळालीच नाही. देशाचा मूड काय आहे हे आता महाविकासआघाडीच्या लक्षात आले आहेत. कालपर्यंत एकत्रित असल्याचे सांगणाऱ्या व हम साथ साथ है असे म्हणणारे महाविकासआघाडीचे नेते आता हम आपके है कौन असे म्हणत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
नागपुरात ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणूकीदरम्यान फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता. मात्र आता लोकांच्या लक्षात आले आहे व तो संपलेला आहे हे हरयाणातील निकालातून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ८० टक्के पेपर सोडविला असून २० टक्के लवकरच पूर्ण होईल, असा दावा फडणवीस यांनी केला.
मी वित्तमंत्री असताना आठ मेडिकल कॉलेजेसची घोषणा झाली होती. त्यात गडचिरोली, भंडारा, वाशीम, बुलडाणा या विदर्भातील जिल्ह्यांचादेखील समावेश आहे. या महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत वाढ होईल व विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिर्डी येथेदेखील अत्याधुनिक व सुंदर विमानतळ साकारणार आहे. आम्ही विकासावरच भर देत असून एका दिवसात एकट्या नागपुरमध्ये १२ ते १३ हजार कोटींच्या कामाचे भूमीपूजन झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.