शिरीष खोबे
नरखेड : नरखेड तालुक्यातील खैरगाव ग्रामपंचायतीच्या ५ वाॅर्डातील १३ जागांसाठी ४१ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. यात २२ पुरुष तर १९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. येथे राष्ट्रवादीचे दोन गट मैदानात आहेत. या ग्रामपंचायतीसाठी भाजपा समर्थित जनता विकास आघाडी तर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, ग्रामीण विकास आघाडी (राष्ट्रवादीचा दुसरा गट) व समता विकास आघाडीने काही वॉर्डात उमेदवार उभे केले आहेत.
ग्रामीण विकास आघाडीचे रवी चौधरी यांनी १३ वॉर्डात उमेदवार उभे करीत उर्वरित तिन्ही पॅनेलला आव्हान दिले आहे. गतवेळी ही ग्रा.पं. भाजप समर्थित गटाकडे होती. विद्यमान भाजपा तालुका अध्यक्ष सुनील कोरडे त्यावेळी उपसरपंच होते. येथे जनता विकास आघाडीने वाॅर्ड क्रमांक ३, ४, ५ मध्ये ७ उमेदवार उभे केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित बब्बू आबा शहा यांच्या बहुजन विकास आघाडीने वाॅर्ड क्रमांक १, ४, ५ यामध्ये ७ उमेदवार उभे केले आहेत. खैरगावात लोणारी माळी व घासे माळींचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक राजकारणात अस्तित्व असावे, समाज एकसंघ असावा यासाठी अजय बारमासे यांनी समता ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून वॉड १ ते ४ वॉर्डात ११ उमेदवार उभे केले आहेत. अपक्ष उमेदवारात भागवत विष्णू ठोंबरे, खुशाल रामदास खोरगे, योगिता प्रदीप लोखंडे याचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक १ मधून ३ उमेदवार निवडून घ्यायचे असून या ठिकाणी तिरंगी लढतीत २ अपक्षही भाग्य अजमावित आहेत. वॉर्ड क्र २ मधून ३ उमेदवार निवडून घ्यायचे आहेत. येथे एकास एक लढतीत १ अपक्ष भाग्य अजमावत आहे. वॉर्ड क्र ३ मधून ३ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहेत. वॉर्ड क्र ४ मधून २ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या ठिकाणी एकास एक लढत होणार आहे. वॉर्ड क्र ५ मधून २ उमेदवार निवडून द्यायचे असून या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
अशी आहे खैरगाव ग्रामपंचायत
मोवाड येथे १९९१ मध्ये आलेल्या महापुरानंतर खैरगावचे पुनर्वसन करण्यात आले आहेत. त्यामुळे गावाची रचना आधुनिक शहराप्रमाणे आहे. विस्तीर्ण परिसरात मोठे रस्ते, नवीन कार्यालये, शाळा, दवाखाना, बाजार, मैदाने हे येथील वैशिष्ट्य आहे. या गावात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते.
एकूण वॉर्ड : ५
एकूण सदस्य : १३
एकूण उमेदवार : ४१
एकूण मतदार : ४,२४९
पुरुष मतदार : २,२०७
महिला मतदार : २,०४२