लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प.मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या नावावरून झालेला वाद जि.प.च्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी उचलून या वादाला आणखी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. बांधकाम समितीच्या सदस्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने, स्वत: अध्यक्षांनी नावावरून झालेल्या दिशाभूल प्रकरणाची कारणमीमांसा करण्यास सांगितले. त्यासंदर्भात विभागाकडून नेमकी पुष्टी होऊ शकली नाही. अखेर नावावरून झालेल्या संभ्रमामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले.जि.प.मध्ये बांधण्यात आलेल्या नवीन सभागृहाला अध्यक्ष निशा सावरकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा आग्रह धरला होता. परंतु बांधकाम समितीने सभागृहाला संत गाडगेबाबा हे नाव दिले. सभागृहाच्या उद्घाटनाच्या वेळी नावावरून वाद उफाळून आला होता. अध्यक्षांनी सावित्रीबाईच्या नावाचा आग्रह धरत उद्घाटनास नकार दिला होता. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने उद्घाटन पार पडले. उद्घाटनानंतर सभागृहाला लावण्यात आलेल्या मार्बलवर संत गाडेगाबाबाच्या नावाचा उल्लेख होता. पण वाद पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून त्यावर काळी पट्टी लावण्यात आली होती. यावरून पुन्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले होते.दरम्यान हा विषय विरोधकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. बांधकाम विभागाने सभागृहाला नाव देताना, सर्वसाधारण सभेची मंजुरी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. नावावरून जि.प.ची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. परंतु बांधकाम समितीचे सदस्य चंद्रशेखर चिखले व नंदा नारनवरे यांनी समितीने एकमताने निर्णय घेतल्याने नावात काहीच वाद नसल्याचे सभागृहाला सांगितले. परंतु अध्यक्षांनी त्यावर आक्षेप घेत, अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप केला. नावावरून निर्माण झालेल्या संभ्रमासंदर्भात कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांसह विरोधकांनी केली. अखेर अति. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कारवाईचे निर्देश सभागृहात दिले.
नावावरून संभ्रम निर्माण करणारे अधिकारी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:58 AM
जि.प.मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या नावावरून झालेला वाद जि.प.च्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी उचलून या वादाला आणखी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. बांधकाम समितीच्या सदस्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने, स्वत: अध्यक्षांनी नावावरून झालेल्या दिशाभूल प्रकरणाची कारणमीमांसा करण्यास सांगितले. त्यासंदर्भात विभागाकडून नेमकी पुष्टी होऊ शकली नाही. अखेर नावावरून झालेल्या संभ्रमामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले.
ठळक मुद्देसभागृहाचा वाद सभेत गाजला : अति. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले निर्देश