योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदरच ‘कोरोना’ची लाट झेलत असलेल्या शहरातील वैद्यकीय क्षेत्रात वाडी येथील वेल ट्रीट हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. इतकी भीषण घटना घडल्यानंतर संबंधित इस्पितळाचे नव्या नियमांनुसार ‘फायर’ तसेच ‘इलेक्ट्रिक ऑडिट’ झाले होते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘फायर ऑडिट’साठी सक्षम अधिकारीच नसल्याने इस्पितळाचे ‘फायर ऑडिट’ झाले नसल्याचा दावा एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला. आश्चर्याची बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये दहा नवजात बालकांचा जीव घेणाऱ्या घटनेला शुक्रवारी बरोबर तीन महिने झाले. मात्र, तरीदेखील शहरातील खाजगी व सरकारी रुग्णालयांनी त्यापासून काहीच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.
आजवर देशभरात अनेक इस्पितळांत आगी लागल्या व शेकडो रुग्णांनी जीव गमाविला. मात्र, तरीदेखील प्रशासकीय यंत्रणा व इस्पितळ प्रशासनांना जाग आलेली नाही. अग्निशमन यंत्रणेकडून वारंवार इशारा दिल्यानंतरदेखील इस्पितळांकडून नियमावलीचे पालन करण्यात येत नाही व त्याची परिणिती जीवघेण्या आगीमध्ये होते. मागील पाच वर्षांत देशभरामध्ये २० हून अधिक इस्पितळांत आगी लागल्या व १० वर्षांत तर शेकडो रुग्णांचे अशा आगींमध्ये बळी गेले.
अग्निशमन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेल ट्रीट हॉस्पिटल हे मनपा हद्दीत येत नाही. त्यामुळे त्याचे ‘फायर ऑडिट’ शहरातील यंत्रणेकडून होऊ शकत नाही. मनपाच्या हद्दीबाहेर ‘फायर ऑडिट’साठी सक्षम अधिकारीच नाही. त्यामुळे या हॉस्पिटलचे ‘फायर ऑडिट’ खरोखरच झाले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘फायर एक्झिट’ची सोयच नाही
इस्पितळांना दर सहा महिन्यांनी ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करणे अत्यावश्यक असते. यासंदर्भात सरकारने कायदादेखील बनविला आहे. मात्र, नियमितपणे हे ‘ऑडिट’ होतच नाही. वेल ट्रिट हॉस्पिटलमध्ये ‘फायर एक्झिट’चीदेखील योग्य सोय नव्हती. शिवाय आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक यंत्रणेची कमतरता दिसून आली.
ऑक्सिजन सिलिंडरमुळे पसरली आग
अतिदक्षता विभागातील ‘एसी’मध्ये ‘शॉर्टसर्किट’ झाले व त्यामुळे आग पसरली, अशी माहिती इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात ‘आयसीयू’मध्ये प्राणवायूचे ‘सिलिंडर्स’ असतात. आग लागल्यानंतर ‘ऑक्सिजन’मुळे आग लवकर पसरते; परंतु या इस्पितळात ‘एसी’जवळ ही ‘सिलिंडर्स’ ठेवले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. इस्पितळात अत्याधुनिक वीजयंत्रणा नव्हती. यंत्रांचा वापर वाढत असताना विजेचे ‘पॅनल्स’ व ‘वायरिंग’ला बदलण्याकडे लक्ष दिले गेले नाही.