महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, नाना पटोले यांची उघड भूमिका
By कमलेश वानखेडे | Published: April 26, 2023 01:22 PM2023-04-26T13:22:17+5:302023-04-26T13:24:37+5:30
महाविकास आघाडी न झाल्यास सगळे प्लान तयार
नागपूर : महाविकास आघाडी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल. तसेच काही कारणांनी महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे सगळे प्लान तयार आहेत, अशी स्पष्ट भूमिका मांडत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला इशाराच दिला.
पटोले बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री ही जनता ठरवते. जनतेच्या मनात काय आहे हे निवडणुकीनंतर दिसेल. काँग्रेस ही जनतेचे प्रश्न घेऊन ताकदीने लढत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सहा सभा होणार आहेत. सहाही विभागीय आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी या सभा होतील. सातवी सभा मुंबईत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकमध्ये एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळेल
- कर्नाटकच्या लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड राग आहे. तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात उद्रेक कर्नाटकात सुरु झाला आहे. काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. कर्नाटकमध्ये एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळेल, असा दावाही पटोले यांनी केला.
फायनरीच्या ठिकाणी सत्तेच्या बगलबच्यांनी जमिनी घेतल्या
- कोकणात रिफायनरी येणार तिथे सत्तेच्या बगलबच्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या हा रिपोर्ट माझ्याकडे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सरकारने स्थानिकांचे मत ऐकून घ्यायला हवे. आमचा विकासाला, उद्योगाला विरोध नाही, असे सांगत लोकांसोबत बसून प्रश्न सोडवावा, अशी मागणी पटोले यांनी केली.