लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर –मागील काही काळापासून देशात काही तत्वांकडून विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकांना चिथावणी देऊन हिंसात्मक वातावरण निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच एखादी छोटीशी घटना देखिल अवास्तव मोठी करून बघता बघता मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाते. देशविदेशातून हिंसा भडकवणारे "टूल किट" सक्रिय केले जातात. या गोष्टींना वेळेत ओळखून समाजाने या अपप्रचाराच्या जीवघेण्या मायाजालातून स्वतःला बाहेर काढायला हवे, असे आवाहन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मंगळवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन हे उपस्थित होते. सोबतच विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हेदेखील उपस्थित होते. समाजाचे विघटन होऊन विलगता आणि आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणवत असले तरीही १९२० च्या दशकातच ते मार्क्सला विसरले आहेत. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करावा लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
मणिपूरमधील हिंसेबाबत सरसंघचालकांनी चिंता व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. जवळपास दशकभर शांतता प्रस्थापित असलेल्या मणिपूरमध्ये हा परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला व यात बाह्य शक्तींचा हात होता का असा सवाल सरसंघचालकांनी उपस्थित केला. ही दुर्दैवी परिस्थिती,समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल, असेदेखील ते म्हणाले.
खेळाडू, वैज्ञानिकांसह केंद्र शासनाला शाबासकीयावेळी सरसंघचालकांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख केला. भारताच्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केली. तसेच चांद्रयानच्या निमित्ताने भारताची शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकदेखील जगाने पाहिली. शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान आणि तंत्रकुशलतेला नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली. आपला देश सर्वच बाबतीत अग्रेसर होतो आहे. आर्थिक स्थितीतदेखील प्रगती दिसून येत आहे. स्टार्टअपची क्रांतीदेखील आपण पाहिली, असे सरसंघचालक म्हणाले.
श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेला मनामनात अयोध्या सजवावी२२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
आंबेडकरांच्या आदर्शांवर देशाने चालावेदेशात एकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एकतेचेच तत्व दिले आहे. त्यांच्या आदर्शांवर देशाला चालावे लागेल. संविधान प्रदान करताना आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या दोन भाषणांकडे लक्ष दिले तर यातील मर्म आपल्या लक्षात येईल. सर्वांनी त्या भाषणांचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
मतदान प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्ययावेळी सरसंघचालकांनी मतदानावरदेखील भाष्य केले. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणूका होतील. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे, असे ते म्हणाले.