नागपूर: कर्नाटकमधील भाजपचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलविण्यासंदर्भातील वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात बोलताना ‘संविधान बदलविण्याची भाषा करणारे हेगडे कोण होत’? भाजपने त्यांना समज द्यावी, असे मत रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना भाजप नेते हेगडे यांच्या संविधान बदलविण्यासंदर्भातील वक्तव्याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, ज्यांनी संविधानावर डोके ठेवले ते संविधान बदलविण्याचा विचार कसा करू शकतात.
हेगडे यांची भूमिका ही भाजपविरोधी आहे. भाजपने त्यांना समज द्यावी. संविधान अजिबाद बदलणार नाही. तसा विचार जरी झाला तरी मी राजीनामा देईल, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे युग संपले आहे. आता एनडीएचे युग आहे. इंडिया आघाडीला कुणी नेतृत्व नाही. मोदी हे सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहेत. त्यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त जागा जिंकू. आम्ही जनतेची कामे केली. महिला आरक्षणाचे बिल पास केले. ३७० कलम हटल्याने काश्मिरमधील दहशतवाद ९० टक्के संपला आहे. जनतेला आमच्यावर विश्वास आहे आणि जनता ज्यांच्या पाठीमागे असते,तोच विजयी होतो, असेही ते म्हणाले.
रिपाइंला दोन जागा हवीलोकसभा निवडणुकीत आम्ही रिपाइसाठी शिर्डी व सोलापूरची जागा मागितली आहे, किमान एक तरी जागा मिळावी, अशी अपेक्षा आहे. जागा मिळाली नाही तरी आमचा पक्ष भाजपसोबत राहील, कारण आम्हाला दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिपाइं भाजपसोबत प्रामाणिकपणे राहिला परंतु त्याप्रमाणे सत्तेत वाटा मिळाला नाही. निवडणुकीनंतर राज्यात किमान एक मंत्रिपद व महामंडळांमध्ये स्थान मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘वंचित’ला वंचित ठेवण्याचाच प्रयत्नवंचितला वंचित ठेवण्याचाच प्रयत्न महाविकास आघाडी करीत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जातील असे वाटत नाही. सन्मानाने जागा मिळाल्या नाही तर त्यांनी जाऊ नये, असेही आठवले म्हणाले.