नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने ताब्यात घेतले. नागपुरात आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली; परंतु अद्यापही त्याच्याकडून स्थानिक हस्तकाबाबत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुलमावा येथील अवंतीपोरा येथील रईस अहमद असादउल्ला शेखने गेल्या वर्षी १३ ते १५ जुलैदरम्यान नागपुरात येऊन डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर त्याला जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीर पोलिसांकडून हँडग्रेनेडसह अटक करण्यात आली होती. चौकशीत रईसने पाकिस्तानमधील जैशच्या हँडलरच्या आदेशावरून नागपुरात रेकी केल्याचे समोर आल्यानंतर, नागपूर पोलिसातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काश्मीरमध्ये जाऊन त्याची चौकशी केली होती.
आता पुढील तपासासाठी एटीएसच्या नागपूर युनिटने रईसचा ताबा घेतला असून, नागपुरात तो कुणाच्या सांगण्यावरून आला होता आणि त्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची कुठून आणि कशी रेकी केली, तसेच कोणकोणती माहिती त्याने पाकिस्तानमधील आपल्या हँडलरला पुरविली, याचा तपास सुरू केला आहे. त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याच्या सखोल चौकशीसाठी एटीएसने प्रोडक्शन वॉरंटवर त्याचा ताबा घेतला आहे.
लॉज-हॉटेलमध्ये नेऊनदेखील चौकशी
रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा घेण्याची प्रक्रिया अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. निवडक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती. कडेकोट सुरक्षेत त्याला नागपुरात आणले व गुप्त ठिकाणी त्याची रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रईस ज्या हॉटेल व लॉजवर थांबला होता, तेथेदेखील एटीएसने त्याला नेले. शिवाय त्याने रेकी केलेल्या ठिकाणीदेखील नेले. मात्र, एटीएसच्या बहुतांश महत्त्वाच्या प्रश्नांवर रईसने कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. सुरक्षा यंत्रणांच्या प्रश्नांना कसे टोलवायचे, याचे त्याला प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे दिसून येत होते.
रईसने बनविल्या होत्या ८ क्लिपिंग्ज
जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने त्याचा रईसला नागपुरात पाठविले होते. नागपुरात पोहोचल्यावर तेथील एक स्थानिक हस्तक तुझी मदत करेल, असे रईसला सांगण्यात आले होते; परंतु त्याचा संपर्कच न झाल्याने रईस एकटाच संघ मुख्यालयासमोर पोहोचला होता. तेथे त्याला व्हिडिओ व फोटो काढण्यात यश आले नाही. त्यानंतर तो रेशीम बागेत गेला. तेथे त्याने ८ क्लिपिंग्ज बनविल्या होत्या. १५ जुलै रोजी तो दिल्लीला परतला. मात्र, उमरच्या संपर्कात असलेला स्थानिक हस्तक कोण, याचा शोध तपास यंत्रणांना रईसच्य चौकशीनंतरदेखील लागू शकला नाही. त्याची रवानगी सोमवारी कारागृहातदेखील झाली.