नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या संविधान प्रास्ताविक पार्कच्या समितीचा वाद मिटला असला तरी या प्रकरणातून नवीन गाेष्टी प्रकाशात येत आहेत. पार्कच्या प्रस्तावाला सात वर्षे हाेऊनही काम मात्र पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे केवळ विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे सरंक्षण भिंत आणि महाद्वाराचे कामच बाकी असल्याने पार्कच्या कामात नेमकी आडकाठी काेण घालत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या संविधान प्रास्ताविक पार्क समितीमधील काही सदस्यांना बाहेर काढण्याच्या प्रकरणामुळे हा विषय चर्चेत आला आहे. कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांनी काढलेल्या सदस्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण यातून नव्या विषयांना ताेंड फुटले आहे.
हा पार्क लोकवर्गणी आणि विद्यापीठाच्या निधीमधून उभारण्याचा निर्णय झाला होता. समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, डॉ. मेश्राम, डॉ. हिरेखण आदी सदस्यांनी निधीसाठी पाठपुरावा केला. याला यश आले व सामाजिक न्याय विभागाने २ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर केला. यानंतर पार्कच्या कामाला गती मिळाली. नागपूर सुधार प्रन्यासला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या निधीमधून डॉ. आंबेडकरांचा पुतळा आणि पार्कमधील इतर गोष्टी तयार करण्यात आल्या.
विद्यापीठाच्या निधीमधून संरक्षण भिंत आणि महाद्वारचे कायम करायचे हाेते. यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यताही दिली. त्यानंतर कुलगुरू चौधरी यांनी पुन्हा बाराहाते समिती स्थापन करून कामासंदर्भात अहवाल तयार करून घेतला. समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेमध्ये मान्यही करण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाने अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद केली होती. मात्र, कुलगुरूंनी या कामाचे आदेश न दिल्याने अद्यापही संरक्षण भिंत आणि महाद्वाराचे काम सुरूच झालेले नसल्याचा आरोप समितीच्या काही सदस्यांनी केला.
कुलगुरूंनी दिले उड्डाणपूल बांधकामाचे कारण
समितीमधील अनेक सदस्यांनी उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी कुलगुरूंची भेट घेतली. मात्र, विधी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने सुरक्षा भिंत किंवा महाद्वार बांधता आले नाही, असे कारण कुलगुरूंनी समिती सदस्यांना दिले. मात्र पार्कचा प्रस्ताव हा ७ वर्षांपूर्वी २०१५चा आहे आणि उड्डाणपुलाचे काम सुरू हाेऊन जेमतेम ४ महिने झाले. मग पुलाचा अडथळा कसा, असा सवाल येत आहे. दरम्यान, सदस्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. त्यांनीही प्रास्ताविक पार्कचे काम सुरू ठेवावे व पुलामुळे ते अडणार नाही, असेही सांगितले. असे असतानाही कुलगुरूंनी अद्याप काम सुरू केले नाही, असा आरोप समितीचे सदस्य व माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी केला आहे. काम पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करणेही संयुक्तिक नाही, असे डाॅ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.