संजय रानडे
नागपूर : नरभक्षक झाली म्हणून ठार मारण्यात आलेल्या अवनी (टी-१) वाघिणीच्या तीन वर्षीय मादा बछड्याचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या वाघाने जखमी केल्यामुळे त्याच्यावर पेंच व्याघ्र प्रकल्पात उपचार सुरू होते. या बछड्याच्या मृत्यूस कारणीभूत कोण, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी विचारत आहेत.
या बछड्याला (पीटीआरफ-८४) ५ मार्च रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. दरम्यान, सीमाधिकारावरून दुसऱ्या वाघासोबत संघर्ष झाल्यामुळे हा बछडा गंभीर जखमी झाला होता. त्याला ८ मार्च रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील उपचार केंद्रात आणण्यात आले होते. पांढरकवडा येथील अवनीला दोन बछडे होते. तिला ठार मारण्यात आल्यानंतर वनविभागाला केवळ एका बछड्यास पकडण्यात यश मिळाले होते. त्याचाही आता मृत्यू झाला आहे. या घटनेसाठी वनाधिकारी दोषी असल्याचा आरोप होत आहे.
१३ माणसांची शिकार केल्यामुळे अवनीला नोव्हेंबर-२०१८ मध्ये ठार मारण्यात आले. त्या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अवनीला एक नर बछडाही होता. वन विभागाला त्यास पकडता आले नाही, पण मादा बछड्याला डिसेंबर-२०१८मध्ये पकडून दोन वर्षे ५.११ हेक्टरच्या बंदिस्त वनात ठेवण्यात आले होते. मादा बछडा मोकळ्या वनात जिवंत राहू शकणार नाही, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज होता. परंतु, त्याला आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतरही जगता आले नाही. दुसरीकडे नर बछडा मानवी हस्तक्षेपाशिवाय मोकळ्या वनामध्ये यशस्वीपणे जगत आहे. अवनीने मृत्यूपूर्वी दोन्ही बछड्यांना शिकारीचे कौशल्य शिकवले होते. असे असताना मादा बछड्याला दोन वर्षे बंदिस्त वनात ठेवण्याची काय गरज होती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावरून तिच्याबाबतीत चुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.
वाघाच्या बछड्याला शिकार करणे शिकवले जाऊ शकते, पण दुसऱ्या प्राण्यासोबत लढणे शिकवले जाऊ शकत नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जास्त आहे. या परिस्थितीत या बछड्याला पेंचमध्ये सोडल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असे असताना तज्ज्ञांच्या समितीने काहीच धडा घेतला नाही. येणाऱ्या काळात ते पुन्हा निसर्ग नियमात हस्तक्षेप करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.