मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी : लोकप्रतिनिधींनी विचारला अधिकाऱ्यांना जाबनरेश डोंगरे नागपूरथेट मुख्यमंत्र्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे शंभरावर मोर्चेकऱ्यांवर करण्यात आलेला लाठीहल्ला कुणावर शेकणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे. लाठीहल्ल्याच्या अनुषंगाने चोहोबाजूने माहिती मागविली जात असल्यामुळे दोन दिवसांपासून गृहमंत्रालय आणि पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याअनुषंगाने पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांना जाब विचारल्याची खास सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आयुक्तांनी लाठीहल्ल्याचा अहवाल बनविण्याचे संबंधितांना निर्देश दिले आहेत. परिणामी मोर्चेकऱ्यांवर अमानुषपणे लाठ्या चालविणाऱ्या दोषींंना धडकी भरली आहे. तीन दिवसात अमानुष लाठीहल्ल्याच्या दोन घटना घडल्याची विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. त्यामुळे केवळ मोर्चेकरी, त्यांचे समर्थक, विरोधी पक्षच नव्हे तर सत्तापक्षातील नेत्यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या बदनामीची ‘पोलिसांनी सुपारी घेतली की काय’, अशी संतप्त विचारणा काही लोकप्रतिनिधी खासगीत करीत आहेत. पाठराखण कुणाची ?कुणावर शेकणार लाठीमार ?नागपूर : न्याय मागण्यासाठी उपाशीतापाशी घोषणाबाजी करणाऱ्या मातंग समाजाच्या मोर्चेकऱ्यांवर शुक्रवारी आणि तत्पूर्वी बुधवारी संगणक कर्मचाऱ्यांवर जोरदार लाठीहल्ला केला. जमाव हिंसक बनत असेल तर त्याला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करण्याची सूट आहे. मात्र, त्यासाठी काही नियम आहे. हिंसा करणाऱ्यांनाच लाठी मारावी, तीसुद्धा पायावर मारली जावी (त्याने पळ काढावा म्हणून) असा दंडक आहे. पोलिसांनी मात्र बुधवारी अनेक बेरोजगारांना अक्षरश: सोलून काढले. त्याची वरिष्ठ पातळीवर पाठराखण झाल्यामुळे शुक्रवारी पोलीस अधिकच निर्दय बनले. त्यांनी मोर्चेकऱ्यांना फोडूनच काढले. रक्तबंबाळ झालेल्या एकेका मोर्चेकऱ्याला चार पाच पोलीस गुराढोरासारखे बदडत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांनी दाखविले. त्यामुळे विरोधीच नव्हे तर सत्तापक्षातील लोकप्रतिनिधीही अस्वस्थ झाले आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत काय झाले, त्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे या लाठीहल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांच्या सर्वच शीर्षस्थांकडून माहिती मागविली जात असल्याने पोलीस आयुक्तांनीही लाठीहल्ल्याचा अहवाल तयार करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)कुणी बदलविली व्यवस्थाविशेष म्हणजे, अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झालेल्या राज्यातील विविध अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांनी विशेष बैठक घेऊन त्यांना त्यांच्या जबाबदारीची माहिती दिली होती. संपूर्ण अधिवेशनादरम्यान कोणत्याही अधिकाऱ्याच्या जबाबदारीत बदल होणार नाही, असेही सांगितले होते. मात्र बाहेरून आलेल्या एका अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी (स्पॉट) बदलवून घेतली. त्यामुळे नव्या जबाबदारीची अर्धवट माहिती असलेले अधिकारी मोर्चा पॉर्इंटवर नेमले गेले आहे. त्यातूनच हा लाठीचार्ज घडल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदारी बदलविण्यास कुणी भाग पाडले, ते बोलायला कोणी तयार नाहीत.
कुणावर शेकणार लाठीमार ?
By admin | Published: December 21, 2015 2:59 AM