मनपा निवडणुकीचा आज निकाल सर्वेक्षणाचा कल भाजपलाच काँग्रेस मारणार का बाजी ? नागपूर : नागपूर महानगर महानगरपालिका निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. मतदारांचा कौल नेमका कुणाला गेला व कोणता पक्ष मनपात गुढी उभारणार, यावरुन पडदा उठणार आहे. ३८ प्रभागांमधील १५१ जागांच्या मतांची मोजणी गुरुवारी होणार आहे. मनपामध्ये भाजपा ‘हॅटट्रिक’ साधणार की कॉंग्रेसची ‘घरवापसी’ होणार, याकडे राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांचेदेखील लक्ष लागले आहे. सत्तेच्या सारीपाटावर कुणाचे फासे नेमके सरळ पडतात, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा या निकालात पणाला लागली आहे. भाजपा-शिवसेना यांच्यातील तुटलेली युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील झालेली बिघाडी यामुळे सर्वच प्रभागांत चौरंगी लढतींचे चित्र पहायला मिळाले. शिवाय सर्वच पक्षांत झालेल्या बंडखोरीमुळे अनेक प्रभागांत काट्याची लढत होती. मागील वर्षीच्या तुलनेत अवघ्या दीड टक्क्यांनी वाढलेले मतदान, बंडखोरी, पक्षाअंतर्गत नाराजी इत्यादी मुद्यांवर निकाल अवलंबून राहणार आहे. अनपेक्षित निकाल आल्यास बसपा, ‘एमआयएम’ हे पक्षदेखील राजकीय समीकरणे बदलविण्यास मौलिक भूमिका पार पाडू शकतात. (प्रतिनिधी)
नागपूरकरांचा कौल कुणाला?
By admin | Published: February 23, 2017 2:07 AM