जलालखेडा : तालुक्यातील खापा घुडन येथील कोतवाल नरखेड येथे कार्यरत असल्याने गत ६ महिन्यांपासून खापा घुडन येथील तलाठी कार्यालयात कोतवाल नाही. मात्र विनोद बागडे रा. जामगाव याची कोतवालपदी नियुक्ती नसताना तो खापा घुडन येथील तलाठी कार्यालयात काम करतो. शेतकऱ्यांकडून ७ / १२ साठी जादा पैसे घेतो. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईचे सर्वेक्षण करताना लाभार्थ्यांना डावलून पैसे देणाऱ्यांना जास्त लाभ मिळवून देतो. शेती संबंधी कागदपत्रे लागल्यास त्यांना पैशांची मागणी करतो. तलाठ्यांना विश्वासात न घेता अवैधरित्या इतरांचे शेती विषयक काम करून देतो. शेतकऱ्यांसोबत अभद्र शब्दात बोलतो, अशी तक्रार खापा घुडन येथील ग्रामस्थांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे केली असता खासगी व्यक्तीला काम करण्यास मनाई नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे खापा घुडन येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे याबाबत दाद मागितली आहे. याबाबत तहसीलदारांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
--
माझ्यावर करण्यात आलेले आरोप निरर्थक आहे. विनाकारण मला त्रास देण्यासाठी माझी तक्रार करण्यात आली आहे.
- विनोद बागडे
--
विनोद बागडे हा सात-बारा व इतर शेतीविषयक कागदपत्र लागल्यास शेतकऱ्यांना जास्त पैशांची मागणी करतो. तसेच शेतकऱ्यांना त्रास देतो.
- दीनदयाल मुरोडिया, घोगरा.