कुलगुरूंचा सवाल : प्रशासकीय मान्यता नसल्याचा पुनरुच्चारनागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द करण्यावरून बरेच राजकारण झाले. विद्यापीठाने एक महिना अगोदर विमानाचे तिकीटदेखील पाठविले होते, असा दावा खुद्द येचुरी यांनी केला होता. मात्र जर कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यताच नव्हती आणि विमान तिकिटाबाबत माझी परवानगीच घेण्यात आली नव्हती, तर मग हे तिकीट नेमके काढले तरी कुणी, असा प्रश्न कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी उपस्थित केला आहे.विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सीताराम येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र प्रशासकीय परवानगीच घेतली नसल्याच्या कारणावरून संबंधित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे पत्र जारी करण्यात आले. यावरून विद्यापीठासोबतच आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. सीताराम येचुरी यांनी नागपुरात आल्यानंतर यासंदर्भात टीका केली व विद्यापीठाने मला एक महिनाअगोदर तिकीट का पाठविले, असा प्रश्न उपस्थित केला.याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता, ज्या कार्यक्रमाची प्रशासकीय मान्यताच घेण्यात आली नव्हती, त्या कार्यक्रमातील वक्त्यासाठी विमानाची तिकिटे काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही पाहुण्याला बोलविताना साधारणत: रेल्वेगाडीचे तिकीट देण्यात येते. जर विमानाचे तिकीट पाठवायचे असेल तर अगोदर कुलगुरूंची लेखी परवानगी घ्यावी लागते. माझी तर कार्यक्रमासाठीच परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पाहुण्यांच्या तिकिटाचा तर प्रश्नच येत नाही, असे डॉ.काणे यांनी सांगितले. जर विद्यापीठाने तिकीट काढले नाही, तर येचुरी यांना तिकीट कुणी पाठविले हा मोठा प्रश्नच आहे, असे ते म्हणाले.संबंधित कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातून आयोजित करण्यात आला होता. मात्र नियमानुसार संबंधित निधी विद्यापीठाच्या विकास विभागाच्या माध्यमातून संबंधित शैक्षणिक विभागात जातो. कार्यक्रमाचा नेमका खर्च कसा झाला याचे अंतर्गत ‘आॅडिट’देखील करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)आगलावेंकडून अद्याप खुलासा नाहीदरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.प्रदीप आगलावे यांच्याकडून कुलगुरूंनी लेखी खुलासा मागविला होता. अद्यापपर्यंत आपल्याला कुठलाही लेखी खुलासा प्राप्त झालेला नाही, असे कुलगुरूंनी सांगितले. २० फेब्रुवारी रोजी कुलगुरूंना पत्र दिले होते, असा डॉ.आगलावे यांनी दावा केला होता. मात्र अशाप्रकारच्या कुठल्याही पत्राची कार्यालयात नोंदच नाही, असे कुलगुरूंनी सांगितले.
येचुरींच्या विमानाचे तिकीट कुणी काढले?
By admin | Published: March 21, 2017 1:41 AM