कळमेश्वर : साहुली (माहुली) बायपासचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गाच्या मधोमध येणारे विजेचे खांब हटविण्यासंबंधी कसलीही कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विजेचे खांब न हटवता विनापरवानगी काम केल्याचा आरोप वीज वितरण कंपनीने केला आहे. मात्र या मार्गावरून वाहन चालविताना अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
कळमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्यांचा दर्जा वाढवून रस्तारुंदीकरणासोबतच नव्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. यात धापेवाडा-घोराड-उपरवाही-लोणारा -गुमथळा-सेलू-कळंबी-साहुली (माहुली) मार्गाचे नव्याने रुंदीकरणाचे काम करण्यात आले. हे काम करीत असताना साहुली गावाला बायपास देण्यात आला. बायपासचे बांधकाम करीत असताना या रुंदीकरणात येणारे विजेचे खांब न हटवीताच मजबुतीकरणाचे काम करण्यात आल्याने रस्त्याच्यामध्ये आलेल्या खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्ता उंच झाल्याने जमिनीपासून वीज तारांचे अंतर कमी झालेले आहे. सदर रस्ता वाहतुकीकरिता सुरू झाला असून, भविष्यात जड वाहनांना तारांचा स्पर्श होऊन अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून गेलेली महावितरणची हायटेन्शन लाइन हटविणे अतिशय गरजेचे आहे.
---
रस्ता रुंदीकरणाचे काम करण्याअगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाला महावितरणकडून २५ ऑगस्ट २०२० रोजी वीजखांब हटविण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे. तसेच सदर रस्त्यावरील खांब हटविण्यासंबंधी अंदाजपत्रक बनवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आलेले आहे.
पंकज होनाडे
उपकार्यकारी अभियंता,
वीज वितरण कंपनी, उपविभाग, कळमेश्वर
---
या मार्गावरील वीज खांब हटविण्यासाठी महावितरण कंपनीने दोन कोटी रुपयांचा खर्च सांगितलेला आहे. परंतु वरिष्ठांनी त्याला अद्याप मंजुरी दिली नाही. वीज वितरण कंपनीने सांगितलेला खर्च फार जास्त आहे. आता नव्याने तीन वीज खांब हटविण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहे.
- ऋषीकेश राऊत
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर
----
साहुली (माहुली) बायपासच्या मधोमध असलेले विजेचे खांब.