श्याम नाडेकर
नरखेड : पावसाळ्यात धबधबे, तलाव, धरणावर हौशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर नरखेड, काटोल तालुक्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. वर्धा नदीत मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांच्या होड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्या होड्यामध्ये वर्धा नदीच्या खोल पाण्यात फेरफटका मारणे हा पर्यटकांकरिता खूप मोठे आकर्षण आहे. या संधीचा उपयोग होडीधारक होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना जल सफारीचा आनंद देतात. जलसफारीसोबतच विविध अँगलने सेल्फी काढणे ही नवीन क्रेझ निर्माण झाली आहे. पर्यटकांकरिता जलसफारी करताना कोणतेही सुरक्षा कवच किंवा सुरक्षा साधनांचा वापर होत नाही.
झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रातील महादेवाच्या मंदिरातून परत येताना होडी उलटून ११जणांना जलसमाधी मिळाली. या घटनेने संपूर्ण वरुड, नरखेड व टोल तालुका हादरला आहे. पर्यटकांची सुरक्षेची जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. जल सफारीकरिता वापरात असलेल्या होड्या या पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्या होड्यांना मच्छीमारीकरीता किंवा पर्यटनाकरिता कोणताही परवाना नाही. होडीला कोणतीही गुणवत्ता प्रमाण नाही. तसेच पर्यटकांना जीवरक्षक कवच उपलब्ध राहत नाही. प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.
---
सूचना फलकांचा अभाव
नरखेड तालुक्याच्या बाजूने खडकाळ भाग असल्याने प्रेमी युगुल, कौटुंबिक सहल तसेच पार्टी करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते, परंतु तेथे प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आलेले नाही.
---
ही काळजी घेणे गरजेचे
- नरखेड तालुक्याकडून जाणाऱ्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलिसांनी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करावा.
-प्रशासनाने धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.
- तरुणांनी अनोळखी ठिकाणी पोहण्याचा किंवा आंघोळ करण्याचा मोह टाळावा.
- प्रेमी युगुलांनी एकांतवासाचा शोध घेण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नये.
- पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने जल सफारी करताना सुरक्षा कवचाचा वापर करावा.
-उपलब्ध होडी तांत्रिक गुणवत्ता योग्यतेची आहे का याची पडताळणी करावी.
-होडीच्या क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांनी जलसफारी करु नये.
----
झुंज धबधबा हा नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असून पर्यटन व जलसफारीचा भाग हा अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये येतो. नरखेड तालुक्याच्या हद्दीमध्ये वर्धा नदीचा खडकाळ भाग येतो. त्यामुळे नागपूर जिल्हा प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.
हरिश्चंद्र गावडे, ठाणेदार, जलालखेडा पोलीस स्टेशन