लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात बेकायदेशीरपणे झाडे ताेडण्यासाठी जणू स्पर्धाच लागली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. अजनी वनातील वृक्षताेड राेखण्यासाठी लढा सुरू असताना ऐतिहासिक अंबाझरी उद्यानालाही अवैध वृक्षताेडीचे ग्रहण लागले आहे. उद्यान परिसरातील शेकडाे झाडे कापण्यात आली आहेत. अनियंत्रितपणे चाललेल्या बेकायदा वृक्षताेडीमागे कुणाचा वरदहस्त आहे आणि कुणाचे अभय आहे, हा संशयाचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाझरी उद्यानात रिसाॅर्ट निर्मितीसह काही विकासाचे काम करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) कडे देण्यात आली आहे. त्यात लग्न व इतर समारंभ घेण्यासाठी व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे. मात्र एका ठिकाणी रिसाॅर्ट बांधण्यात येत असताना सर्वच परिसरातील झाडे ताेडण्याचा सपाटा लावला आहे. या कामासाठी ५० झाडे ताेडण्याची परवानगी महापालिकेकडून मागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ५० नाही तर ३०० च्यावर झाडे ताेडली गेली. उद्यानाच्या बाहेरील भागात ही अनियंत्रित वृक्षताेड हाेत असताना आतमध्ये काय चालले, याबाबत कुणालाही कल्पना नाही कारण कुणाला जाऊ दिले जात नाही. मनपाच्या उद्यान विभागाला या वृक्षताेडीचे काही साेयरसुतक नाही.
जेसीबीने पाडली झाडे
- तलावाच्या बांधाला लागून असलेली अनेक झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. वादळाने ही झाडे पडली असल्याचे भासविले जात आहे. मात्र ती वादळाने नव्हे तर जेसीबीने उखडण्यात आल्याचे स्पष्ट पुरावे येथे बघायला मिळतात.
माॅर्निंग वाॅकर्सचा संताप
मागील वर्षी लाॅकडाऊनपासून हे उद्यान बंद आहे. मात्र सकाळी माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना परवानगी हाेती पण गेल्या काही महिन्यांपासून कुणालाही उद्यानाच्या आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळ फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
लाेकांची मते तरी जाणून घ्या
उद्यानामध्ये सेलिब्रेशनसाठी रिसाॅर्ट निर्मिती केली जात आहे. विकासाच्या नावावर शेकडाे झाडे ताेडली गेली. शहराचे वैभव असलेल्या या उद्यानाला भकास बनविण्याचा हा प्रकार आहे. लाेकांची मते जाणून घेतली गेली नाही. काहीतरी भ्रष्टाचार हाेत असल्याचे दिसते आहे.
- डाॅ. नाना पाेजगे
काेराेना महामारीमध्ये ऑक्सिजनअभावी अनेकांचे जीव गेले तरीही नि:शुल्क ऑक्सिजन देणाऱ्या असंख्य झाडांना कापले जात आहे. अंबाझरी उद्यानात हा बेकायदेशीर प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
- डाॅ. अभय सिन्हा
शहरातील सर्व उद्याने सकाळी फिरणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली असताना अंबाझरी उद्यान का बंद ठेवण्यात आले, हा प्रश्न आहे. बाहेरच्या परिसरातील शेकडाे झाडे कापली गेली आहेत. आतमध्ये काय चालले, हे संशयास्पद आहे.
- डाॅ. नरेश साठवणे
नाली खाेदण्याचे कारण काय?
अंबाझरी उद्यानाच्या गेटसमाेरच माेठी नाली खाेदण्यात आली आहे. ही नाली कशासाठी खाेदली याचे उत्तर येथे काम करणाऱ्या कुणाजवळच नाही. मात्र या नालीमुळे वाहने पार्किंगपर्यंत नेण्यास अडचणी येत असून रस्त्यावरच पार्क करावे लागत आहे.
- सीए चेतन मालविया
गेल्या २५ वर्षापासून या उद्यानात फिरायला येताे पण असे कधी झाले नाही. उद्यानातील शेकडाे झाडे आम्ही नागरिकांनी लावली व जगवली आहेत. आता ही झाडे ताेडली जात आहेत. उद्यानाचा सत्यानाश करण्याचा प्रकार चाललेला आहे.
- बबन माेहड
विद्यापीठ परिसराजवळ आंबेडकर सभागृहापासून असंख्य झाडे ताेडण्यात आली आहेत. आम्ही लावलेली व नैसर्गिक वाढलेली ५०० च्यावर जवळपास झाडे बेकायदा ताेडण्यात आली आहेत. हा प्रकार संतापजनक आहे.
प्रदीप काेल्हे
मनपा काय करते?
अंबाझरी उद्यानातील शेकडाे झाडे अशाप्रकारे बेमुर्वत कापली जात आहेत. शहराचे हरीत वैभव नष्ट केले जात आहे. अशावेळी महापालिकेने या अवैध वृक्षताेडीकडे दुर्लक्ष करावे, हे शहरातील नागरिकांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
- देवीदास ढाणके