नागपूर : अनेक मोबाईल अन् वारंवार सीमकार्ड सापडूनही ‘या मोबाईलचे बोलविते धनी’ कोण, ते शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन खणखणतच राहिले आणि गुन्हे घडतच राहिले. कैदी पलायनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा वादग्रस्त मुद्दा चर्चेला आला आहे. त्यामुळे या गैरप्रकाराला काही अंशी पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप आता होत आहे.खतरनाक गुन्हेगारांचे रेस्ट हाऊस ठरलेल्या मध्यवर्ती कारागृहात अनेकदा मोबाईल आणि सीमकार्ड सापडले. वेळोवेळी त्याची धंतोली पोलीस ठाण्यात नोंदही झाली. जप्त करण्यात आलेल्या या मोबाईलच्या आयएमईआय तसेच सीमकार्डच्या क्रमांकावरून हे मोबाईल तसेच त्यातील सीमकार्ड कुणाच्या नावे आहेत, ते शोधणे पोलिसांसाठी सहज शक्य आहे. मात्र, ज्या ज्या वेळी कारागृहात मोबाईल सापडले त्या त्या वेळी पोलिसांनी कोणती चौकशी केली ते कधीच उजेडात आले नाही. कारागृहात सापडलेल्या मोबाईलवरून कुणी-कुणाकुणाला फोन केले, कुणाला धमकी मिळाली, कुणाला खंडणीची मागणी झाली, हे कधीच उघड झाले नाही. अजनी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्यामुळे आरोपीने कारागृहातून फोनवर संपर्क साधून ‘त्या‘ व्यक्तीला धमकी दिल्याचे उघड झाले. मात्र, असेच आणखी किती प्रकार घडले, सापडलेल्या सीमकार्ड तसेच मोबाईलचा वापार करणाऱ्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई काय केली, पोलिसांच्या चौकशीतून काय साध्य झाले, ते कधीच उघड होऊ शकले नाही. त्याचमुळे आता पोलिसांभोवतीही संशयाचे वलय निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगार, गैरप्रकारात गुंतलेले अनेक जण दुसऱ्याच कुणाच्या नावाने असलेले सीमकार्ड किंवा मोबाईल वापरतो. अनेक गुन्ह्यात गुन्हेगारांनी वापरलेले सीमकार्ड रिक्षावाले, हातमजुरीवाल्यांच्या नावे असल्याचे उघड झाले आहे. संबंधित गुन्हेगार पोलीस कारवाईत अडकू नये, यासाठी ही खबरदारी घेत असतात. त्यामुळे आपले नाव पुढे येणार नाही, असे त्यांना वाटते. मात्र, सीडीआरमधून खऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी अनेकदा नागपूरसह ठिकठिकाणच्या पोलिसांनी बजावली आहे. कारागृहात सापडलेल्या मोबाईल आणि सीमकार्डच्या बाबतीत ही कारवाई का झाली नाही, याचा खुलासा झालेला नाही. या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनी ‘या गैरप्रकारातही गैरप्रकार असल्याचे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.(प्रतिनिधी)आळा बसला असता पोलिसांनी कडक भूमिका घेऊन सीमकार्ड आणि मोबाईलचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढून संबंधितांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर कारागृहातील मोबाईलची रिंगटोन बंद करण्यात यश येऊ शकले असते. तसेच गैरप्रकाराला आळा बसला असता. कंपन्यांचा दोषही उघडसहजपणे सीमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या मोबाईल आॅपरेटर कंपन्याही कारागृह प्रकरणाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केल्या आहेत. कागदपत्रांची फारशी शहानिशा न करता त्या सीमकार्ड उपलब्ध करून देतात. जारी केलेले सीमकार्ड तीच व्यक्ती वापरते काय, याची तसदी घेण्याची गरजच मोबाईल आॅपरेटर कंपन्यांना वाटत नाही. त्यामुळे भलत्याच्या नावे असलेले सीमकार्ड वापरून गुन्हेगार अनेकदा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरतात.पुन्हा मिळाले मोबाईलमध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी तपासणीदरम्यान पुन्हा सात मोबाईल, सहा बॅटऱ्या आणि पाच सीमकार्ड मिळाले. विशेष म्हणजे, लोकमतने यापूर्वी कारागृहात ५०० च्या वर मोबाईल असल्याचे वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले आहे.
मोबाईलचे बोलविते धनी कोण?
By admin | Published: April 06, 2015 2:14 AM