कुलगुरूनिवड प्रक्रियेला आज सुरुवात नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसंदर्भात सोमवारी विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा होणार आहे. कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची शिफारस करण्यात येईल. आपल्याच गटातील सदस्याची निवड व्हावी याकरिता शिक्षण मंच आणि तायवाडे गटाकडून पूर्ण जोर लावण्यात येत आहे. संख्याबळ लक्षात घेता शिक्षण मंचाला चांगलीच कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान विद्यापीठातील राजकारणाचे बदलते रंगदेखील दिसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.२५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ.विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विनायक देशपांडे यांना देण्यात आली. परंतु पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास विलंब का होत आहे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. नियमानुसार जुन्या कुलगुरूंच्या राजीनाम्यानंतर नवीन कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया तीन महिन्यांच्या आत सुरू व्हायला हवी. याकरिता जाहिरातदेखील प्रकाशित व्हायला हवी. परंतु २५० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी, विशेष परीक्षा विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ, ‘नॅक’चा दौरा यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली.निवडप्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून विद्यापीठातील विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा २७ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आली आहे. यातून कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची शिफारस करण्यात येणार आहे. हा सदस्य आपल्याच गटातील असावा यासाठी विद्यापीठात जोरदार राजकारण सुरू आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर विद्यापीठ शिक्षण मंचमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे डॉ.तायवाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे विद्यापीठातील प्राधिकरणांवर असलेले प्राबल्य लक्षात घेता तेदेखील पूर्ण जोर लावणार हे निश्चित. कुलगुरूपदावर याच गटातील पात्र व्यक्तीची निवड करण्यासाठी त्याच्या नावाची शिफारस करणारा हक्काचा सदस्य असावा त्याकरिता दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
विद्यापीठात ताकद कुणाची?
By admin | Published: October 27, 2014 12:34 AM