लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी रेंजअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर व सावंगी शिवारात वाघाचा वावर वाढला आहे. या वाघाने चालू पंधरवड्यात चार शेतकऱ्यांच्या पाच गुरांची शिकार केली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला वारंवार विनंती करूनही वाघाचा बंदाेबस्त केला जात नसल्याने त्याचा बंदाेबस्त करायचा कुणी, असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या वाघाने मयाराम सरियाम, रा. ढवलापूर या शेतकऱ्याच्या बैलाची रविवारी (दि. १९) शिकार केली. तत्पूर्वी, त्याने राजेंद्र लक्ष्मीचंद उईके यांचे दाेन बैल तर परमेश्वर दयाराम उईके यांचा एक बैल व सुधाकर सुखदेव उईके यांच्या एका गाईची शिकार केली आहे. या सर्व घटना शेतात शेतकरी व शेतमजुरांच्या समाेर घडल्या आहेत. त्याने पाेळ्याच्या दिवशी सकाळी राजेंद्र उईके यांच्या बैलाची शिकार केली. सहज खाद्य व पाणी मिळत असल्याने वाघ हा शिवार साेडायला तयार नाही. शिवाय, वन अधिकारी त्याचा बंदाेबस्त करायला तयार नाही.
शिकार केल्यानंतर वन कर्मचारी त्यांच्या सवडीने पंचनामा करतात. सहा ते १० महिन्यांनी त्या जनावराची तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन बाेळवण करतात, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी साेमवारी (दि.२०) या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन विभागाने या वाघाचा कायम बंदाेबस्त करावा तसेच पिकाचे व मृत जनावरांची नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे व तातडीने द्यावी, अशी मागणी ढवलापूरच्या सरपंच प्रीती उईके, ललित घंगारे, झोलबा इनवाते, संदीप करनाके, मिथुन उईके, प्रदीप धुर्वे, बाकेराव उईके, भोजराज परतेकी, नीलेश उईके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
नरभक्षी हाेण्याची शक्यता
या भागातील प्रत्येक व्यक्ती कामासाठी शेतात नियमित जातात. वाघाने शेतकऱ्यांसमाेर त्यांच्या गुरांची शिकार केली आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी त्याला पिटाळून लावले आहे. त्या वाघाला हळूहळू माणसाची सवय हाेत चालली असून, पुढे ताे शेतकऱ्यांवर हल्ला चढविण्याची शक्यता बळावली असेल. तसे झाल्याने ताे वाघ नरभक्षी हाेईल. तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही जाणकार व्यक्तींनी उपस्थित केला आहे.
...
ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही शेतमजूर जंगलात तेंदूपत्ता संकलन व माेहफूल गाेळा करायला जायचे. वन अधिकाऱ्यांनी काहीही दाेष नसताना काही मजुरांवर गुन्हे नाेंदविले. हल्ली ही गरीब माणसे न्यायालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. यात त्यांचा पैसा व वेळ खर्च हाेत असून, त्यांना त्या दिवशीच्या मजुरीवर पाणी फेरावे लागत आहे.
...