नागपूर :जिल्हा परिषदेत उपाध्यक्षाची निवड सर्वश्रृत आहे; पण काँग्रेसचा गटनेता कोण? यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे गटनेता निवडताना ज्येष्ठ सदस्याला संधी दिली जाते. त्यातही पुरुष सदस्याकडेच काँग्रेसचे गटनेतेपद राहिले आहे. परंतु, यंदा काँग्रेसकडे असणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांवर विशिष्ट गटाचा ठपका आहे. तो ठपका असल्याने गटनेतेपदाची जबाबदारी नव्याकडे जाण्याची शक्यता आहे.
सार्वत्रिक निवडणुकीनंतर मनोहर कुंभारे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. सोबतच ते गटनेतेसुद्धा होते. परंतु, त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने गटनेत्याची निवड केली नाही. आता जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे झाले आहेत. काँग्रेसने उपाध्यक्षही जवळपास निश्चितच केला आहे; पण खरी निवड गटनेत्याची आहे. ही जबाबदारी साधारणत: ज्येष्ठ सदस्यांवर सोपवली जाते.
सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे नाना कंभाले, अरुण हटवार, तापेश्वर वैद्य, शांता कुमरे, कुंदा राऊत हे पाच सदस्य ज्येष्ठ आहेत; पण नव्या सदस्यांमध्येही गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी चुरस लागली आहे. यात प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, अवंतिका लेकुरवाळे यांचेही नाव चर्चेत आहे.
सध्या जिल्हा परिषदेत केदार गटांचे वर्चस्व आहे. ज्येष्ठ सदस्यांवर इतर गटांचा ठपका आहे. दोन महिला सदस्यदेखील ज्येष्ठ आहेत. परंतु, गटनेत्याची जबाबदारी पुरुषांवरच सोपविली जाते. काही ज्येष्ठ सदस्यांची अपेक्षानुरूप अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यांना गटनेतेपद मिळेल अशी अपेक्षा आहे; पण गटातटात सदस्य विभागले असल्याने गटनेता निवडीसाठी पक्षाच्या होणाऱ्या बैठकीत कुठला गट भारी ठरतो हे बघणे महत्त्वाचे आहे.
- विरोधी पक्षनेते पदासाठी कारेमोरे ?
भाजप जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते पोटनिवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे आजवर सभागृहात उपगटनेते व ज्येष्ठ सदस्य व्यंकट कारेमारे हेच पक्षाची बाजू सांभाळत होते. परंतु, आता सभागृहातील सदस्यांची संख्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे भाजपलाही विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार आहे. या पदासाठी भाजपकडून व्यंकट कारेमोरे, कैलास बरबटे, आतिष उमरे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, भाजप ज्येष्ठ सदस्य म्हणून कारेमोरे यांनाच झुकते माप देईल, असे बोलले जात आहे.