कमलेश वानखेडे
नागपूर : मान्सूनच्या आगमनासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची आनंदवार्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील इच्छुकांच्या आशा बळावल्या आहेत. शिंदे गटाकडून आ. आशिष जयस्वाल यांचे तर भाजपकडून आ. कृष्णा खोपडे, प्रवीण दटके व समीर मेघे यांची नावे चर्चेत आहेत. आता मंत्रिपदाच्या रिमझिम पावसात भिजण्याची संधी कुणाला मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १० जुलैपूर्वी होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे बोलून दाखविली. त्यामुळे मंत्रिपदाच्या चर्चेला पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूर शहर जिल्ह्याला मिळून आणखी एखादे मंत्रिपद मिळू शकते. त्यापेक्षा जास्त संधी नाही. अशात नंबर लागण्यासाठी पक्षांतर्गच मोठी स्पर्धा आहे.
जिल्ह्यात कुणबी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे झाल्यास दक्षिणचे आमदार मोहन मते व हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. मेघे कुटुंबाचा शहर व ग्रामीण असा दोन्हीकडे प्रभाव आहे. त्यामुळे मेघे यांचे पारडे जड मानले जात आहे.
तेली समाजाचा विचार करायचा झाल्यास पूर्व नागपूरचे आ. कृष्णा खोपडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण याच समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आ. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ही बाब खोपडे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.
जातीपातीचा विचार न करता संघटनात्मक कामाचा आधार घेत विचार केला तर आ. प्रवीण दटके यांनाही संधी मिळू शकते. माजी महापौर राहिलेले दटके हे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत. शिवाय सर्वच घटकात त्यांचा वावर असून शहरात तगडा कनेक्ट आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. या सर्वबाबी दटकेंचे पारडे जड करणाऱ्या आहेत.
रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल शिंदे गटात सामील झाले असले तरी त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही तेवढीच जवळीक आहे. शिंदे गटाकडून जयस्वाल यांचे नाव पक्के मानले जात आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या ग्रामीण विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी जयस्वाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर नुकतेच भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भाजपच्या बैठकांना जयस्वाल यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत खडेबोल सुनावले होते. मात्र, त्यावेळीही भाजपचे शीर्षस्थ नेते पडद्यामागून जयस्वाल यांच्या बाजूने राहिले. शिवाय ठाकरे गटाचा त्यांच्यावर असलेला रोषदेखील जयस्वाल यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
तुमाने समर्थकांना दिल्लीकडून आशा
- केंद्रीय मंत्रिमंडळाचाही विस्तार होण्याचे संकेत आहेत. शिंदे गटातील दोघांना संधी मिळण्याची व यातील एक विदर्भातील असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्व गोळाबेरीज डोळ्यासमोर ठेवून विस्तार केला जाईल, हे स्पष्ट आहे. रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांचे समर्थक दिल्लीकडे आशेने पाहत आहेत.