नागपूर विद्यापीठ : उमेदवारांचे शोध समितीसमोर सादरीकरण पूर्णनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपद निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे पोहोचत आली आहे. रविवारी आठ इच्छुक उमेदवारांनी शोध समितीसमोर सादरीकरण केले व निवडप्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग पार पडला. सर्वच उमेदवारांनी आपले सादरीकरण उत्तम झाले असल्याचा दावा केला असून आता शोध समितीसमोर १८ पैकी अंतिम ५ जणांची नावे निवडण्याचे आव्हान आहे. ही पाच नावे कोणती राहतील याबाबत विद्यापीठ वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय चहांदे व ‘एमगिरी’चे संचालक डॉ.प्रफुल्लकुमार काळे यांच्या त्रिसदस्यीय शोध समितीने शनिवार व रविवारी १८ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात शनिवारी १० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात प्रामुख्याने उमेदवारांकडून कशा प्रकारे सादरीकरण करण्यात येते याकडे शोध समितीचे बारीक लक्ष होते. विद्यापीठाच्या विकासासंदर्भात उमेदवारांचे ‘व्हिजन’ व येथील परिस्थितीला सुस्थितीत आणण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येतील याबाबत शोध समितीकडून विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सादरीकरण करणाऱ्यांमध्ये जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम, नांदेड येथील डॉ.आर.सी.थूल, मुंबई विद्यापीठाचे डॉ.संजय देशमुख, डॉ.एम.एन.सराफ, डॉ.एन.जे.गायकवाड, डॉ.डी.जी.वाकडे, डॉ.डी.के.गौतम तसेच डॉ.घोडके यांचा समावेश होता.यातील पाच सर्वोत्तम उमेदवारांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व याच आठवड्यात राज्यपाल त्यांच्या मुलाखती घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळपर्यंत या नावांची यादी राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. यात नेमके कुणाचे नाव असेल याबाबत निरनिराळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)पारदर्शकता हवीदरम्यान, कुलगुरू निवडप्रक्रियेच्या बाबतीत निवड समितीने प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. सादरीकरणासाठी किती व कोणते उमेदवार बोलविण्यात आले होते याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या पदाच्या निवडीत राजकारण शिरले असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरूपद हे सार्वजनिक कक्षेत मोडते व त्यामुळे याबाबत पूर्णत: पारदर्शकता हवी असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोण होणार ‘टॉप ५’?
By admin | Published: April 06, 2015 2:16 AM