लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, ही अवघ्या मराठी जनांना लागलेली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. साहित्य महामंडळ आणि तिच्या सर्व संलग्नित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी होणार असून या बैठकीनंतर अध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक रद्द करून सर्वसंमतीने अध्यक्ष निवडीची घटनादुरुस्ती झाल्याने सर्वांना याबाबत उत्सुकता आहे. नवबदलाची नांदी ठरलेल्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिलेला स्थान मिळेल, ही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. असे झाले तर यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या संमेलनाचे अध्यक्षपद वैदर्भीय कवयित्री प्रभा गणोरकर यांना मिळण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.२०१९ चे अ.भा. मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होऊ घातले आहे. संमेलनाच्या एकूणच नियोजनाबाबत गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ येथे बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये महामंडळासोबत सध्या चार घटक संस्था, पाच समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्थांच्या पदाधिकाºयांचा समावेश आहे. संमेलन अध्यक्षांच्या निवडीबाबत रविवारी मंथन होणार आहे. महामंडळाच्या घटनादुरुस्तीनुसार महामंडळाच्या घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट संस्थांकडून पाच, संलग्न संस्थांकडून प्रत्येकी एक नाव, संमेलन निमंत्रक संस्थेकडून एक तर विद्यमान संमेलन अध्यक्ष एक नाव, अशी २० नावे या बैठकीत सादर करण्यात येतील. यादरम्यान विदर्भ साहित्य संघाकडे असलेल्या महामंडळाच्या कार्यालयाची मुदत ३१ मार्चला संपत असल्याने तसेच आगामी संमेलन यवतमाळच्या रूपाने विदर्भात होणार असल्याने अध्यक्षपद याच भागातील व्यक्तीला मिळावे, अशी अपेक्षा एकूणच विदर्भकरांची आहे. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षापासून एकही महिला अध्यक्षपदी विराजमान न झाल्याने हे पद महिला साहित्यिकास मिळावे, अशीही परिवर्तनवादी भूमिका घेतली जात आहे. यामध्ये अर्थातच प्रभा गणोरकर यांचे नाव चर्चिले जात आहे.यापूर्वी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिलांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. गणोरकर यांना अध्यक्षपद मिळाल्यास या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पाचव्या महिला ठरतील. विदर्भ साहित्य संघानेही त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे सासवड येथे झालेल्या ८७ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभा गणोरकर यांचा पराभव झाला होता.
कोण होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:15 PM
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, ही अवघ्या मराठी जनांना लागलेली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. साहित्य महामंडळ आणि तिच्या सर्व संलग्नित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी होणार असून या बैठकीनंतर अध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक रद्द करून सर्वसंमतीने अध्यक्ष निवडीची घटनादुरुस्ती झाल्याने सर्वांना याबाबत उत्सुकता आहे.
ठळक मुद्देआज घोषणा होण्याची शक्यता : यवतमाळात मंथन सुरू