भिवापूर : जिल्हात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश आहे. शिवाय शनिवार व रविवार अत्यावश्यक बाबी वगळता बाजारपेठा सुद्धा बंद असणार आहे. त्यामुळे शहरात खरेदीदारांची शुक्रवारी गर्दी उसळली होती. महत्त्वाचे म्हणजे आजचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे ही गर्दी भाजीपाला विक्रेत्यांच्या दैनिक गुजरीतही पोहोचली.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ७ मार्चपर्यंत तालुकास्तरीय आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. शिवाय शनिवार व रविवार हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार व बाजारपेठ बंद ठेवण्याचेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, शुक्रवार हा तालुक्याचा आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे गर्दी उसळण्याची शक्यता होती. मात्र नगरपंचायत प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच शुक्रवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येत असल्याची सूचना केली होती. त्यामुळे आठवडी बाजाराच्या ठिकाणी शुक्रवारी एकही दुकान थाटल्या गेले नाही. मात्र तरी सुद्धा शनिवार व रविवार सलग दोन दिवस बाजारपेठ व व्यापार बंद असल्याने शहरातील मार्गावर दिवसभर गर्दी पहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीविक्रेत्यांनी आपली दुकाने दैनिक गुजरीत थाटली. शिवाय पुढील दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार असल्याने शहरवासीयांनी सुद्धा भाजीपाला खरेदीसाठी दैनिक गुजरीत गर्दी केली होती. यादरम्यान फिजिकल फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र होते.
विनाकारण घराबाहेर पडू नका
कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी पुढील दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार व बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.