जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, लोहारीसावंगा, भिष्णूर, थडीपवनी, मोवाड, नरखेड अशा अनेक गावांमध्ये सट्टापट्टीचे प्रमाण वाढले आहे. हा सट्टापट्टी बाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई गेल्या काळात झाली नाही. त्यामुळे हा धंदा चालविणाऱ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढलेला.
तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे युवकांना याचे व्यसन जडत आहे. सट्टापट्टीमुळे आजवर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सट्टा लावण्यासाठी पैसा नसल्यास पत्नीकडे पैशाची मागणी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तशी प्रकरणे आता पोलिसात येऊ लागली आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या सट्टापट्टी बाजारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
-----
थडीपवनी येथे सट्टापट्टी सुरू आहे. याबाबत जलालखेडा पोलीस स्टेशनला ८ डिसेंबरला तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही.
कांतेश्वर ढोले, तक्रारकर्ता, अंबाडा.
----
मी जलालखेडा पोलीस स्टेशनचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.
मंगेश काळे, ठाणेदार, जलालखेडा.