सावनेरमध्ये केदारांना कोण रोखणार? भाजपाचे दिग्गज नेते मैदानात
By जितेंद्र ढवळे | Published: October 12, 2023 03:35 PM2023-10-12T15:35:06+5:302023-10-12T15:37:27+5:30
२६ ग्रा.पं.साठी मोर्चेबांधणी
नागपूर :काँग्रेसचा गड असलेल्या सावनेर तालुक्यात ७५ पैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गेली पाच टर्म या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या आ. सुनील केदार यांचा विजय रथ कोण रोखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गतवर्षी झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाला विजय मिळाला होता. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत केदार यांचा विजयरथ रोखण्यासाठी ग्रा.पं.निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने दंड थोपाटले आहेत. केदार यांना शह देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतद्दार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. आशिष देशमुख हेही मैदानात उतरले आहे. भाजप नेते गोवोगावी जावून मतदारांशी संवाद साधत आहेत.
काँग्रेसकडून नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे ग्रा.पं.साठी मोर्चेबांधणी करित आहेत. तालुक्यात निवडणूक होत असलेल्या काही ग्रा.पं. जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे आणि माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या सर्कलमध्ये मोडतात. त्यामुळे येथे कुणाचे सरपंच विजयी होतात, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसचे सहा जि.प.सदस्य तर १२ पंचायत समिती सदस्य
सावनेर मतदार संघात मोडणारे सहा जि.प.सर्कल आणि १२ पंचायत समिती गणात सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे तर सावनेर तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.मध्ये कॉंग्रेस समर्थित गटाचे सरपंच आहेत.