लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातून बोलले जात आहे. अशात दिवाळीनंतर शासन ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यास शासनाचा विचार आहे. पण शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी अथवा शिक्षकांना कोरोना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केला आहे.
काही राज्यात शाळा सुरू केल्या. त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. हा प्रकार राज्यात होणे नाकारता येत नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर १५ दिवस काळजी घेऊन डिसेंबरपर्यंत वाट बघावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. संंघटनेच्या मते शाळा सुरू करण्यासंर्द्भात व्यवस्थापनाच्या विविध अडचणी आहेत. कोरोनासंबंधीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासंबंधाने कोणतीही आर्थिक तरतूद नाही. शाळेची पूर्वतयारी करण्यासाठी शाळांचे वेतनेतर अनुदान अजूनपर्यंत निर्गमित केले नाही. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शाळांना आवश्यक पूर्वतयारी करण्यासाठी देय असलेले वेतनेतर अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. शाळांमध्ये सगळी व्यवस्था करण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची परवानगी देण्यात यावी.
सरकारने द्यावा खुलासा
१) शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची तपासणी करून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधी सांगितले आहे. परंतु उपाययोजना कोण करणार, शासन की शिक्षक यासंबंधी स्पष्ट खुलासा करावा.
२) शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी अथवा शिक्षकांना कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याची जबाबदारी कोण घेणार यावर खुलासा करावा.
पालकांची लेखी संमती आवश्यक
शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासन जबाबदारी घेण्यास तयार नाही. पालकांनी लेखी संमती दिल्याशिवाय व पालकांनी स्वत: जबाबदारी घेतल्याशिवाय शाळा प्रशासन शाळा सुरू करण्यास तयार नाही.
रवींद्र फडणवीस, कार्यवाह, महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ