अभय लांजेवार
उमरेड : सोयाबीन, कापूस, तूर, भात आदी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. बियाणे, खते, औषधी, मजुरी आणि इतर भरमसाठ खर्च वजा होता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा खिसा खाली झाला. अशातच यंदाच्या हंगामात शासनाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’अंतर्गत बियाण्यांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावयास लावले. आता दाखल अर्जाची लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. कसेबसे केवळ ८ हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. लवकरच हंगाम सुरू होणार आहे. बियाणे हातात नाही. अशावेळी बियाण्यासाठी कुणाची लॉटरी लागणार हेसुद्धा माहिती नाही. त्यातही लॉटरी लागली तर लागली, नाही तर पावली. लॉटरीचा हा जुगार सरकार आमच्याशी का खेळत आहे, असा मार्मिक प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. तालुका स्तरावर अद्याप बियाण्यांच्या लाभाबाबत कोणत्याही प्रकारची सूचना नाही. अधिकाऱ्यांनाही लॉटरी निघणार एवढेच माहीत आहे. अन्य माहितीबाबत कृषी विभागसुद्धा अनभिज्ञ आहे. शेतकरी नंबर कधी लागणार, अशी विचारणा करीत कृषी विभागाला घिरट्या घालत आहेत. राज्य स्तरावर लॉटरी काढली जाणार असल्याचे समजते. अद्याप लॉटरीच निघाली नाही. सर्वप्रथम १५ मे व त्यानंतर २४ मेपर्यंत ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. गावखेड्यात शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात कृषी विभागाला अपयश आले. अनेकांपर्यंत योजनाच पोहोचली नाही. यामुळे गरज असतानाही हजारो शेतकऱ्यांना अर्ज सादर करता आले नाहीत. शिवाय योजनेचा मुहूर्तच उशिराने काढल्या गेला. कोरोनाच्या महामारीमुळे नागपूर जिल्ह्यातून केवळ ७,७९२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला. मोजक्याच शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतरही लॉटरी पद्धतीने सोडत काढणार असल्याचे निर्देश आहेत. लॉटरी निघाल्यानंतरही असंख्य शेतकरी या योजनेच्या बियाण्यांपासून वंचित राहतील. यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ ही म्हण तंतोतंत खरी ठरणार आहे. लॉटरी पद्धतीने सोडत निघाल्यावर किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, हेसुद्धा कळणार आहे. दुसरीकडे अर्ज करणाऱ्या सर्वांनाच बियाणे देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
खात्यात नको, कपात करा
महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आदी मोठ्या निधीच्या योजना आहेत. या योजनांमध्ये मोठे अनुदान असल्याने लॉटरी पद्धत आणि अनुदानाची रक्कम खात्यात वळती करणे, ही बाब योग्य आहे. अशातच बियाण्यांच्या बाबतीतही खात्यात अनुदान वळती होणार आहे. अल्प अनुदानाकरिता बँकेच्या चकरा कशाला, असा सवाल केला जात असून बियाण्यांचे हे अनुदान खात्यात वळती करू नका, ते थेट कपात करूनच रक्कम घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.
--
लॉटरीत नंबर लागला तर ठीक, नाहीतर कृषी केंद्राकडे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी धाव घ्यावी लागणार आहे. कागदपत्रे सादर केल्यानंतर, बिल अपलोड झाल्यानंतर मगच या तुटपुंजा अनुदानाची रक्कम खात्यात वळती होईल. केवळ एक-दीड क्विंटलच्या बियाण्यांसाठी एवढी धावपळ शक्य तरी आहे काय?
-नागसेन निकोसे, शेतकरी चांपा, ता. उमरेड