लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिंतीवर आणि मेट्रोच्या पिलवर देशविरोधी नारे लिहिणाऱ्या आरोपीचा छडा लावून सीताबर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जयंत रघुनाथ कुकडे (वय ५२) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.कोळसा आणि खडूने सीताबर्डीतील रेल्वे कॉलनीच्या सुरक्षा कुंपणावर आणि मेट्रोच्या पिलवर मंगळवारी देशविरोधी नारे आढळल्याने पोलीस प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेतली. ते नारे धुवून पुसून काढण्यात आले. त्यानंतर हे नारे लिहिणारा कोण त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यात पहाटेच्या वेळी वेडसरसारखा दिसणारी एक व्यक्ती हा उपद्रव करीत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीत आढळलेल्या व्यक्तीची पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. बुधवारी रात्री ७.४५ च्या सुमारास तशाच वर्णनाची व्यक्ती जीपीओ चौकात फिरत असल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक काळे यांनी अपाल्या सहकाऱ्यांसह तेथे धाव घेत त्याला ताब्यात घेतले. जयंत कुकडे (वय ५२) नामक ही व्यक्ती अकोला जिल्ह्यातील कोलखेडा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. कौटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून त्याची मानसिक अवस्था बिघडल्याने तो फिरत फिरत नागपुरात आला आणि वेडसरपणाचे चाळे करीत फिरत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले. सीताबर्डीतील गोपनीय विभागात कार्यरत असलेले हवालदार सुरेश धोटे यांच्या तक्रारीवरून कुकडे विरुद्ध सार्वजनिक संपत्ती विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
कुकडेला उपचाराची गरज!देशविरोधी नारे लिहिणाऱ्या कुकडेला पोलिसांनी कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याची व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन देत मुक्तता केली. कुठेही राहणे आणि मिळेल ते खाणे असा कुकडेचा जीवनक्रम आहे. मात्र, त्याने निवडणुकीचा प्रचार टोकाला असताना सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नारे लिहून खळबळ उडवून दिली होती. त्याचे कुठलेही गुन्हेगारी कनेक्शन पोलिसांना आढळले नाही. त्यामुळे आता पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याचा पोलिसांचा मानस आहे.