विरोधकांनी झळकविले फलक : सभागृहात उडाला गोंधळनागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष केवळ नावापुरत्याच आहे. सर्व कारभार त्यांचे पती बघत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात ‘जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण, निशाताई की टेकचंद’ अशा आशयाची फलके झळकवित सभागृहाचे लक्ष वेधले. लोकप्रतिनिधीच्या संदर्भात शासनाचा ६ जुलै २००६ चा जीआरची अंमलबजावणी करून कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी सीईओंना केली. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, उपाध्यक्ष शरद डोणेकर, अतिरिक्त सीईओ अंकुश केदार, सभापती उकेश चव्हाण, दीपक गेडाम, पुष्पा वाघाडे, आशा गायकवाड उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या बुस्टर डोजमुळे आजच्या सभेत विरोधक चांगलेच आक्रमक दिसून आले. विरोधकांनी ‘भाजप सरकारचा निषेध’ अशा आशयाची फलके घेऊन सभागृहात प्रवेश केला. सदस्य उपासराव भुते, नाना कंभाले, मनोज तितरमारे यांनी जिल्हा परिषदेत गाजलेल्या घोटाळ्यांच्या यादीचे फलक आपल्या पोषाखावर लावले होते. त्याचबरोबर भ्रष्टाचारी जिल्हा परिषद प्रशासनाचा धिक्कार असो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण... या आशयाचे फलक लावून विरोधक सभागृहात आले होते. अध्यक्षाचे पती अधिकार नसतानाही अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात, डीपीडीसीच्या निधीचा अहवाल स्वत: तयार करतात. जनसुविधेचा प्रस्ताव तयार करतात. अध्यक्ष केवळ नाममात्र आहे. त्यामुळे ६ जुलै २००६ च्या शासनाच्या लोकप्रतिनिधी संदर्भातील जीआरची अंमलबजावणी करून अध्यक्षांच्या पतीना जिल्हा परिषदेच्या बाहेर काढावे, अशी मागणी सदस्यांनी चांगलीच रेटून धरली. विरोधकाचा हा प्रकार बघून अध्यक्ष चांगल्याच संतापल्या, हा माझा अपमान असल्याचे सांगत, फलक काढल्याशिवाय सभागृहाचे कामकाज होणार नाही, असा दमच त्यांनी दिला. मात्र विरोधकांनी आक्रमकता कायम ठेवल्याने, सत्ताधारी सदस्य अध्यक्षाच्या बाजूने सरसावले. वेलमध्ये येऊन विरोधकांचा विरोध केला. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता. (प्रतिनिधी)विरोधकांची राजकीय स्टंटबाजीअध्यक्षांचे पती कारभार चालवत असतील तर, सदस्य आपली कामे त्यांच्या पतीला सांगतात का, साडेचार वर्षाच्या काळात असे कुठलेही फलक दिसले नाही. तेव्हा विरोधक झोपले होते का, असा सवाल करीत, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून विरोधकांनी राजकीय स्टंटबाजी केली आहे. या माध्यमातून त्यांनी महिला अध्यक्षाचा अपमान केला आहे. उकेश चव्हाण, सभापती, शिक्षण समिती
जि.प.अध्यक्ष कोण ?
By admin | Published: September 21, 2016 3:01 AM